RSS

खिडकी

16 एप्रिल

प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी मनासारख्या जुळून येतात.

आमच्या अपार्टमेंट मध्ये अशीच एक माझी आवडती जागा आहे. आमच्या लिविंग रूम मधली भली मोठी खिडकी. त्या खिडकीला लागून आम्ही एक छोटासा सोफा ठेवलाय. का कुणास ठाऊक पण त्या खिडकीचं, त्या सोफ्याचं आणि माझं असं एक वेगळचं भावविश्व तयार झालंय.

पहाटे जिम वगैरे आटपून घरी आल्यावर, वाफाळत्या गरम कॉफीचा कप घेऊन इथे बसायला मला प्रचंड आवडतं. एकतर अगदी नुकतीच उजाडायला सुरुवात झालेली असते, वर्कआऊटच्या adrenaline rush मुळे की काय पण जाम productive, positive असं काही बाही वाटत असतं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अजून घरात तशी शांतता असते; भले मग ती वादळापूर्वीची का असेना पण मुलांच्या चिवचिवाटाला सुरुवात न झाल्याने खिडकीबाहेरून येणारे पक्षांचे आवाज अगदी सहज ऐकू येत असतात. त्यातून हातात कॉफीचा कप असेल तर विचारूच नका, सुख सुख म्हणतात ते हेच काय !

रोजची वेगळी सकाळ अनुभवलीय मी इथे बसून. इनमिन १० मिनिटांचा खेळ सगळा पण रोजच्या to-do लिस्ट पासून ते अगदी या लेखापर्यंत सगळ्या गोष्टींची साक्षीदार आहे ही जागा. आपण लहानपणी शिकलॊय की, पृथ्वीचा आपण राहतो तो भाग सूर्यासमोर आला की दिवस होतो, खरंतर किती रुटीन प्रोसेस पण खरं सांगू या खिडकीतून दिसणारा सूर्योदय कधी रुटीन वाटलाच नाही मला. रोज निराळा !

कधी शुभ्र ढगांमधून हळूवार उमटणारं ते केशरी सूर्यबिंब. आता अंधार होता असं वाटत असताना हलकेच उमटू लागणारी केशरी छटा. लांबवर असणाऱ्या झाडांचे शेंडे स्पष्ट करत जाणारी उजेडाची तिरीप इतकी सुंदर की असे वाटावे इथून हलूच नये.

पण दुसऱ्याच दिवशी दूरची झाडेच काय पण अगदी समोरची घरेही दिसू नयेत इतके धुके आणि मग सूर्योदयसुद्धा एखाद्या आळशी मुलासारखा फक्त चादरीबाहेर डोके वर काढून आपण जागे असल्याची ग्वाही देणारा.

या खिडकीने माझ्याबरोबर असे किती अगणित सुंदर क्षण पाहिलेत. बाहेर धो धो कोसळणारा पाऊस हा तर माझ्या प्रचंड जिव्हाळयाचा विषय.पावसाने हवेत आलेला गारवा, बोचरा पण तरीही हवाहवासा वाटणारा. समोर दिसणाऱ्या झाडांना जागोजागी दिसू लागलेली कोवळी, ताजी ताजी पोपटी पालवी. सगळं कसं नजरेत साठवून ठेवावं असे.

का कुणास ठाऊक, पाऊस जितका जवळचा वाटला तितका स्नो नाही कधी वाटला. अमेरिकेत आल्यावर सुरुवातीचं वर्ष जरा वाटलं आकर्षण स्नोचे कारण त्याआधी स्नो पहिला होता, तो फक्त यश चोप्रांच्या movies मध्ये! पण जसजशी वर्षे गेली तसा हा स्नो भेटतं तर राहिला दरवर्षी पण त्याच्याशी दोस्ती झाली नाही कधी हेच खरे. हे सगळे ऋतू पाहिलेत मी याच माझ्या लाडक्या ठिकाणी बसून आणि मग कधी ही जागा माझ्या रोजच्या रुटीनचा भाग होऊन गेली तेच नाही कळले मला.

गेल्या समरमध्ये रोज सकाळी एक आजी-आजोबा फिरायला जाताना दिसायचे. आजोबा जरा जास्त थकलेले, त्यामुळे आजी त्यांचा हात धरून सावकाश चालत असायच्या.त्यांची माझ्या बिल्डिंगसमोरून जाण्याची वेळ कधीही बदलली नाही. पण एक दिवस अचानक दोघेपण दिसले नाहीत. आणि मग एक दिवस एकट्या आजी दिसल्या, का कुणास ठाऊक पण मला त्या जरा जास्त थकलेल्या वाटल्या. काळजात चर्रर्र झाले माझ्या, काय झाले असेल आजोबांना? एकदा वाटले विचारावे आजींना , पण खरं सांगू नाही धाडस झाले माझं. पुढचे २ दिवस सतत मनात येत राहिले की आज असतील का आजोबा सकाळी ? शेवटी २-४ दिवसांनी पुन्हा दोघे एकत्र दिसले आणि काय बरं वाटलं म्हणून सांगू.

माझी ती खिडकी, तो सोफा, बाहेर दिसणारा निसर्ग, दिसणारी माणसं आणि माझं असं एक आगळंच विश्व तयार झालंय. कितीदा तरी असं झालय की मला वाटायचं, नको आज जिम, कंटाळा आलाय, उगीचच दमल्यासारखे झालंय थोडक्यात काय तर आळस आलाय पण नेमकं अशा वेळीच एखादा अनोळखी चेहरा भल्या पहाटे जॉगिंगला जाताना मला इथूनच दिसायचा आणि कसे काय माहित पण मीही नकळत जिमकडे वळायचे.

मनातल्या असंख्य वादळांना अलगद शमवण्याचे सामर्थ्य दिलाय मला माझ्या या जागेने. ही १० मिनिटाची शांतता कितीदा मनातला गुंता सोडवायला कामी आलीय माझ्या. ज्या गोष्टीचा आपण इतका विचार करतोय ती गोष्ट किती सहज आणि सोप्पी आहे हे समजायला मदत केलीय मला या जागेने. हा वेळ, ही जागा माझी आहे, माझ्या एकटीची, रोजची प्रचंड घाई गडबड सुरु होण्यापूर्वी आणि बाकीच्यांसाठी काहीबाही कारण्यापूर्वीची, माझी हक्काची १० मिनिटे ! कितीदा माझ्यातल्या मला शोधायला या जागेने, या क्षणांनी मदत केलीय. किती आठवणी, किती संकल्प, किती हळवे क्षण पाहिलेत, अनुभवलेत मी इथे. माझ्या या लहानश्या परिघात !

 

2 responses to “खिडकी

  1. Meghana

    एप्रिल 16, 2020 at 3:37 pm

    Madhura you really nailed it…I can imagine that window in front of my eyes while reading your blog..

    Keep writing and we would love to read it.

     

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: