RSS

Monthly Archives: जुलै 2011

संताप


कालपासून  TV वर आणि आज पेपर मध्ये सगळीकडे मुंबईच मुबई भरून राहिलेय.. बातमी काय तर “मुंबईवर  पुन्हा दहशतवादी हल्ला..”  खरं सांगू.. या बातमीतला सर्वात जास्त खटकलेला शब्द कोणता.. “पुन्हा” ..असे हे पुन्हा किती  वेळा?? .. आज वर्तमानपत्रात ९३ पासून मुंबईवर झालेल्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांची यादी आलीय.. सुन्न झाले मन ती यादी पाहून..

का आपणच पुन्हा पुन्हा या हल्ल्यांना बळी पडतो.. काहीच उपाय नाही का यावर.. आणि दर वेळी सामान्य जनताच का भरडली जाते यात?  अगदी मान्य की भौगोलिक दृष्ट्या आपला देश खूप मोठा आहे.. कुठे कुठे लक्ष ठेवणार.. अरे पण एकट्या मुंबईने इतके हल्ले सहन केले.. त्यात ही फक्त झवेरी बाजार मध्ये ३ हल्ले झाले. मग निदान त्या भागाला तरी पुरेशी सुरक्षा नको??

अतिशय संताप झालाय आता.. हे कधीच थांबणार नाही का? कि हे थांबावे ही आपल्या राज्यकर्त्यांची इच्छाच नाही??  कित्ती दिवस आणि का?? नक्की काय हवाय काय या दहशतवाद्यांना ?

आणि आपणही किती सरावलोय या सगळ्याला.. अजून दोन चार दिवस फार फार तर पंधरा दिवस चर्चा होईल या सगळ्यावर..पुन्हा जो तो आपल्या विश्वात रममाण.. ते नवीन हल्ले होई पर्यंत..

अरे अजून आपण आपले गुन्हेगार पकडत नाही.. पकडले तर त्यांना मनाने सोडून तरी देतो कुठल्याशा दबावाला बळी पडून .. नाहीतर त्यांना तुरुंगात पाहुणचार तरी करतो.. का का असे??? काहीच उपाय नाही का यावर .. खरच आपण इतके हतबल आहोत का? असू तर का आहोत इतके हतबल.. या सगळ्याला आपल्या सरकारचा  संयम म्हणायचे का भित्रेपणा ? सरकारच्या कामाला analyze करायची माझी कुवत नाही. पण एक सामान्य माणूस म्हणून एक नागरिक म्हणून फार फार असुरक्षित वाटते अलीकडे.. हे सगळे कधी थांबणार? आपल्याच देशात आपणच सुरक्षित नसल्याची भावना केवढी भयानक आहे..

आता वाटते आपण सामान्य लोकांनीच काहीतरी केले पाहिजे.. काय माहित नाही मला… कसे ते ही माहित नाही.. पण काहे तरी करायला हवे एवढे नक्की.. कुठे तरी हे सगळे थांबायला हवे.. आपल्या एकजुटीने थोड्या जागरूकतेने.. हे सगळे आपल्याच लोकांसाठी तरी केले पाहिजे आपण..

फार फार उदास वाटतंय आज.. हे सगळे ऐकून त्या रागासाठी .. त्या हतबलतेसाठी आणि त्या चिडचिडीसाठी केवळ हा ब्लॉग..

 
 

श्रद्धा !!


आज तिन्हिसांजेला देवापुढे दिवा लावताना सहज एक विचार मनात तरळून गेला… का लावतो आपण देवासमोर दिवा? का प्रसन्न वाटते नुसते तिथे बसले तरी ?

मनातल्या गुंत्याला निगुतीने इथेच सोडवता येईल असे का वाटते? .. खरं तरं अजून माझी पिढी अशी आहे ज्यांनी आईला रोज अगदी नियमितपणे देवासमोर दिवा लावताना पाहिले आहे.. मग ती अगदी नोकरी करणारी आई का असेना.. रोज सात वाजले की देवासमोर बसलेच पाहिजे ..शुभंकरोती म्हटलीच पाहिजे.. नवीन श्लोक मुक्खोद्ग्त झालेच पाहिजेत.. हे कंपल्शन अगदी लहानपणापासून केल्याने असेल कदाचित… पण हळूहळू गोडी लागत गेली.. लहानपणी रागही येत असेल कदाचित.. नको ही वाटत असेल कदाचित.. अगदी मनाचे श्लोक लोळूनही म्हटले असतील निरर्थक निषेध दर्शवायला.. पण म्हटले होते..

तो उदबत्तीचा सुगंध .. ते मंद तेवणारे निरांजन याचे पवित्र्य कळण्याइतके मन परिपक्व ही नव्हते तेव्हा पण त्यासमोर बसून शुभंकरोती म्हणून घेणारी आई अगदी नेहमीपेक्षा काकणभर जास्तच प्रेमळ वाटायची… सारं कसं शांत आणि सौम्य वाटायचं..

आज वाटतं ..खरचं संस्कार हे न बोलताच होत असावेत .. कुठलाही अभिनिवेश न ठेवता केलेल्या कृतीतूनच रुजत असावेत.. देवघरातली आई , आजी बघूनच देवघराचे मह्त्व मन्मनी दाखल झाले.. आजही मोगर्‍याची फुलं पाहिली ना की बाळकृष्णाला सहस्त्र फुलांचा अभिषेक करणारी आजी डोळ्यासमोर येते… लोणी पहिले की ..पहाटे उठून काकडा करणारी आणि लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवणारी आई डोळ्यासमोर येते.. आणि मग वाटते किती श्रद्धेने करत त्या हे सगळे.. ती श्रद्धाच आपल्यालाही वाट दाखवतेय का हे सगळे पुढे चालवायची… एका देवघरात किंवा आजच्या जमान्यातल्या किमान देव्हार्‍यात केवढी तरी ताकद सामावलेली असते नाही.. रोज प्रवचन वाचताना कुठेतरी मनातल्या कोड्यांची उत्तरे सापडताहेत असे वाटते.. जवळच आहे पण हातात येत नाही असेही होते कितीदा.. अर्थात अध्यात्मावर वगैरे लिहवे एवढी माझी शक्ती ही नाही आणि कुवत ही नाही पण आज फार तिव्रतेने वाटले की एवढा मोठा ठेवा आपल्याला मिळालाय आपल्याच माणसांकडून एक मोठी वसा.. पण आपण त्याला पुरेसे महत्व न देता नुसते पळतोय का अशा एका सुखाच्या चित्राकडे की जे खरेच चित्र आहे की केवळ एक आभासी प्रतिमा हे ही माहित नाही.. त्याच्या रेषा माझ्यासाठी आहेत का हे ही माहित नाही.. ना रंग ठाऊक ना रूप..पण ओढ तर भलतीच तिव्र.. बरं ते गवसल्यावर तरी मला आनंद होणार आहे की ही माहित नाही.. आणि ते मिळवण्यासाठी मी मात्र धावत रहातो.. सतत.. कधी माझ्या परिघात कधी परिघाबाहेरही.. पण खरचं तितक्या श्रद्ध्देने ते तरी करतो का आपण?

आज श्रद्धेला हद्दपार तर करत नाही आहोत ना आपण… भले ती देवावर असो वा कामावरती.. फक्त कसल्याशा वेगाने पछाडल्यासारखे वागतोय आपण सगळेच..

अजून आठवतयं मला… आम्ही घरातले सगळे.. म्हणजे.. आई-बाबा.. काका-काकू, दोन्ही आत्या आणि सगळ्यांची आक्खी घरं (चिल्लिपिल्ली वगैरे वगैरे..) दर डिसेंबरमध्ये जमायचो गोंदवल्याला.. काका सरकारी नोकरीत असल्यामुळे तिथेले सरकारी विश्रामगृह आम्हाला मिळायचे.. केवढाला मोठा हॉल आणि टुमदार सोपा असं काहीसं होतं ते.. समोर हे भले मोठे अंगण आणि तिथे चिक्कार चिंचेची झाडे.. अहाहा..काय मजा होती.. पहाटे उठून आई-काकू, आत्या सगळ्या काकड आरतीला जात..मग आपसूकच आमचेही पाय तिकडे वळत.. अजूनही तो प्रसन्न स्वर घुमतोय माझ्या मनात… अतिशय शांत वातावरण..एक वेगळ्याच चैतन्याने भारलेली सगळीच लोकं.. सुरेल स्वरांनी मंगलमय झालेली पहाट.. गुरूमहाराजांच्या आरत्या, भजनं, बाळकृष्णाचा लोणी-साखरेचा नैवेद्य आणि त्याचे ते अतिशत कर्णमधुर पद..

सगळं जग स्तब्ध झालयं आणि सारे रस एका भक्ती रसात नाहून निघालेत असे काहीसे वाटायचे.. काकडा होताच, गोंदावल्यातल्या सगळ्या देवळांना जाण्याची प्रथा ही इथूनच मनात रोजून गेली… थोरला राम, धाकटा राम, शनी, दत्त.. नाना मंदिर फिरत फिरत त्या सगळ्या देवळांच्या इतक्य सुरस कथा ऐकल्या आहेत की त्या आजही तितक्याच मनाला भिडतात… मग गावात फेर-फटका करता-करता आम्हा मुलांचे कोण लाड व्हायचे.. महाराजांचे फोटो असणारी किती लॉकेट्स जमवली होती मी तेव्हा… दुपारची वेळ होताच आई वगैरे स्वयंपाकघरात शिरायच्या.. महाराजांच्या…मदतीला.. केवढाल्या भाज्या निवडणे, चिरणे आणि काय काय.. तेव्हा ना.. शेणाने सारवलेला मंडप असायचा आणि पत्रावळीवर जेवण..कसलं अ‍ॅट्रॅक्शन होतं त्याचं पण.. आणि मग आम्ही मुलं पंगतीला ठेव, पाणी वाढ असली काम करायला पुढे सरसावायचो आणि मग सुरू व्हायचा एकच गजर.. रामनामाचा.. पंगतीत्त फिरत फिरत जय जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणणार्‍या गुरूजींचा तो भारदस्त आणि भक्तिमय आवाज अजून घुमतोय मनात.. खरचं कोणी कधी बसून समजावून वगैरे नाही सांगितलं की तुला इथे श्रद्धा ठेवायचीय हं.. पण हे सगळं बघूनच आणि तिथल्या वातावरणाचा महिमा म्हणूनही.. आजही मनातली सगळी वादळ तिथेच जाऊन शमतील असा एक विश्वास अशी श्रद्धा वाटते.. पण आज असं वाटतयं आपण आपल्या पुढच्या पिढीला हीच ओढ लावू शकू का.. अर्थात आपल्या वागण्या-बोलण्यातून..का ते फक्त पाहतील सतत धावणार्‍या आई-वडिलांना.. आणि या धावण्यावरच नाही ना बसणार त्यांची श्रद्धा? किती हवे ? काय हवे? कशासाठी हवे याची उत्तरे मिळतील का त्यांना? अगदी त्यांचे पण सोडा पण आपल्याला तरी मिळतील का? की भुतकाळात कमावलेले अथवा आपसूक मिळालेले रूजलेले हे श्रद्धचे बीज आपणच भविष्याच्या तरतूदीच्या नादात गमावून नाही ना बसणार आपणच??

नाही कदाचित.. मनात ठाम ठरवले तर.. आजच्या सारखा एक दिवस सारखा सारखा येईल आयुष्यात जो मला आठवण करून देईल त्या सगळ्या गोष्टींची ज्या माझ्या माणसांनी मला अगदी हातात आणून दिल्यात, त्या सगळ्या दिमाखात माझ्या श्रद्धेला पाठबळच देतील..जुन्या श्रद्धा जपण्याची शक्ती.. त्यांना तितक्याच अलवारपणे पुढच्या पिढीकडे सोपवायची शक्ती देतील.. तितक्याच श्रद्धेने तितक्याच तन्मयतेने.. खात्री आहे मला…

 

टॅग्स: , , ,

संचित


आज ना माझी भाची माझ्याकडे रहायला आली आहेतिच्याशी आज पोटभर गप्पा मारल्या.. एवढी मजा आली म्हणून सांगूएकदम तिच्याएवढेच झाल्यासारखे वाटायला लागलेय मला

कशी मजा असते ना.. आपल्याकडे जे असते ना ते सोडून दुसरेच काही हवे असते आपल्याला कायम.. लहानपणी मोठे व्हायची घाई.. आणि मोठे झालो की का बरे झालो मोठे म्हणून चेहर‍यावर एक आठी..

आज तिच्यानिमित्ताने मला लहान झाल्यासारखे वाटायला लागलेय.. असं वाटतयं खरचं पुन्हा लहान होता आलं तरं.. शाळेतला निबंधाचा विषय वाटतोय नाही….

माझी अवस्था आज एक भलं मोठं आणि विस्कटलेलं कपाट आवरणार्‍या मुलीसारखी झालीयकपाट आवरताआवरता हाती येणार्‍या प्रत्येक वस्तूच्या आठवणींमध्ये हरवताहरवता नक्की काय आवरतोय हेच कळू नये असे काहीसे झालेय.. आज तर मी नुसती लॅपटॉप कढून लिहायला सरसावलेय.. विषय ठरवला नाही की मजकूर.. फक्त लिहित जायचे अगदी फुलपाखरी मनाने एवढेच काय ते ठरवलेय

असं होतं ना कधी कधी .. वाटतं की.. एखादा क्षण मुठीत बंद करून ठेवावा अगदी अलगद.. आणि मग हळूच मूठ उघडून ते क्षण पुन्हा एकवार जगावेत ..स्वैर सोडावे मनाला आणि भटकू द्यावे त्याला , त्याला आवडलेल्या स्मृतींमध्ये.. जसे हवे तसे.. हवे तिथेठरलं तर मग आजचा दिवस दिली सुट्टी मनाला भटकू दे त्याला हवे तेवढे.. बघू तरी जाते कुठे कुठे ते..

पण त्याला नाही हां कळू द्यायचे

काय मस्त वाटतयं इथेकुठे आहोत माहितेय आपण आमच्या तळमावल्याच्या घरात.. हे भले मोठ्ठे घर होते ते

दिवसभर नुसते बागडतं असायचे मी इथे.. आणि आत्ता काय बरं करतेय मीअच्छा .. या खिड्क्यांना धरून बाबांबरोबर बाहेर बघण्यात रममाण दिसतेयकाय मज्जा यायची माहितेय.. बाहेर भले थोरले अंगण .. नानाविध फुलांनी फुललेली बाग.. आणि सोबत बाबांच्या गोष्टी.. जेमतेम वर्षदिड वर्षाची दिसतेय मी.. अरेच्चा हे काय.. बाबांना पेशंटनी हाक मारलेली दिसतेय.. ते नुसते मागे वळले आणि आणि हा काय प्रताप माझा..मी डायरेक्ट खिडकीतून खाली उडीअरे देवा.. असे झाले होते तरझाले.. आईबाबांची भलतीच भंबेरी उडवली की हो मी.. मग काय पुढचे दोन महिने.. अस्मादिक प्लॅस्टरचा पाय घेऊन शकूनीमामा झालेलो दिसतोय.. काय पण नसता उद्योगीपणा म्हणायचा हा….. पण काय लाड करू घेतले मी अहाहा.. कायम कडेवरआणि म्हणालं तो खाऊ..

मजा आहे बुवाअरे पण हे काय आता कुठे तरी वेगळीकडेच आलेलो दिसतोय आपणहे ना माझ्या काकूचे घर ..सातार्‍याचे.. मला ना फार फार आवडायचे हे घरं.. तो लाकडी गोल गोल जिना.. माझा आख्खी दुपार मुक्काम तिथेच असायचा.. आताही तिथेच सापडेन बहुतेक.. काय म्हटलेलं मी तुम्हाला.. पण हा काय अवतार.. डोक्याला भला मोठा टॉवेल गुंडाळून वेणीसारखा टॉवेलचा शेपटा तर झोकात रुळतोय.. आणि हातात पट्टी घेऊन शाळा घेणे चाललेय इथे.. आणि शाळेत विद्यार्थी एकच.. माझे भाऊ आजोबा..

“काय हे साधा २ चा पाढा येत नाही तुम्हाला ?? कसे काय होणार तुमचे मोठेपणी ? ” चांगली खरडपट्टी काढणे चालू आहे की मास्तरीण बाईंचं. “सॉरी सॉरी” विद्यार्थी आता गयावया करण्याच्या मूडमधे.. “काही नाही जा आधी पालकांची चिठ्ठी घेऊन या”.. “अहो, माझे आई-बाबा इथे नसतात .. मी काका काकूंकडे रहातो.. ” आजोबा माझीच नक्कल करतायत की काय…  तेवढ्यात मास्तरीण बाईंचे उत्तर.. “ठीक आहे.. मग स्थानिक पालकांची आणा सही.. ” आता मात्र विद्यार्थी आणि हे सगळॆ आठवणारी मी हसून हसून लोटपोट.. स्थानिक पालक.. ??? कुठून कळला होता हा शब्द मला… आणि कसला नेमका वापरला मी… 🙂 🙂

असेच फिरत रहावे वाटतेय.. कुठे कुठे जाता येईल याचे चक्र सुरू झालेय.. वेग चांगलाच आलाय.. पण हे काय पुन्हा रेंगाळलेली दिसतेय मी.. आता कुठे???

अरेच्चा.. ही तर माझी खूप खूप लाडकी शाळा.. कराडची… इतके सुंदर दिवस होते ते.. सर्वात सुंदर… खरचं फुलपाखरी..

आता एक एकदम धाडसी विधान..तय्य्यार???

मला ना अभ्यास करायला ना खूप खूप आवडायचे.. .अगदी मनापासून आवडायचे.. त्यामुळे शाळाही आवडायची..

अर्थात शाळेत अभ्यास सोडून दंगाही चिक्कार केला.. थांबा थांबा… मी शाळेत नुसतीच भटकतेय.. आता तुम्हाला ही घेऊन चलते..

हे ना आमचे ग्राऊंड.. काय खेळायचो.. दिसले का मी.. तिथे हो.. ते खो-खोचे सामने चाललेत ना तिथे.. ते काय बहुतेक डाव दिसतोय आमचा.. आणि केवढा गलका अर्थात हवाहवासा.. पक्कड पक्कड खिच के पक्कड… हा हा हा.. ब्रिदवाक्य जणू…

थांबा जरा पुढे जाऊ.. इथे ना आमच्या वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या ..त्या तर माझ्या जीव की प्राण..

आणि इथे गॅदरिंग.. आणि हा आमचा वर्ग.. आणि या माझ्या अतिशय प्रिय बोधे बाई.. मराठी शिकवतायत आत्ता… इथून बाहेर पडूच नये वाटतेय..

मला ना वाटायचे कायम.. की इथेच शिकवावे मोठे झाले की.. काही स्वप्न स्वप्नच रहातात ना पण….

वा वा.. काय सुंदर प्रवास होता… एकदम फ़्रेश झाले मी … खरचं असा फेर-फटका मारला पहिजे सारखा-सारखा..  आपण आपले धावत असतोच की रोज.. नवीन अनुभव गाठीशी बांधत.. पण हे असे क्षण एक सुरेल उत्तर देतात आपल्या प्रश्नांना.. का पुढे जायचे ..का जमवायचे अनुभव तर या अशा सुंदर क्षणांच्या संचितासाठी….

 

ता.क..  बरेच दिवस ब्लॉग वरून गैरहजर होते मी.. बरेच लेख नुसतेच लिहले आणि पोस्ट नाही केले.. केवळ आळस….

त्यामुळे आधीच लिहिलेला हा लेख आज पोस्ट करतेय..

आणि एक.. हा ब्लॉग जिच्या मुळे लिहिला गेला.. त्या माझ्या लाडक्या तानियाला खूप खूप थॅंक्यू… 🙂 🙂

 

टॅग्स: ,

शोधा म्हणजे सापडेल !!


काल मी एक सिनेमा पाहिला.. RunAway Bride.. खरं तरं तुमच्या पैकी बर्‍याच जणांनी तो केव्हाच पाहिला असेल.. कारण सिनेमा येऊन तब्बल एक तप उलटून गेलयं.. पण नेहमीप्रमाणे मी अस्मादिकांना त्याची महती उशीरा कळली… असो..

अहाहा.. काय सुंदर आहे पिक्चर.. अप्रतिम.. ज्युलिया रॉबर्टनी इतकं सुरेख काम केलयं… असो.. त्यावर एक नवीन पोस्ट होईल..

हा सिनेमा पहाताना ना..सारखा एक विचार मनात येत होता.. काय बरं कारण असेल हिचं असं लग्नाच्या वेदीवरून पळून जाण्याचं.. न आवडलेला नवरा..(पण हे एकदा होईल दोनदा होईल.. पण इतके सारखे सारखे.. ) , काही पुर्वेतिहास.. की लग्नाची भीती… कथा साधीच असून उत्सुकता मात्र जबरदस्त लागून रहिली होती.. ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावणारा आपला हिरो तिच्या सर्व माजी होवू घातलेल्या नवर्‍यांना तिला अंडी कशा प्रकारे खायला आवडतात हे विचारत असतो.. ती उत्तरे प्रत्येक जण वेगवेगळे देत असतात ..या उत्तरांमध्ये एक मजेशीर बाब ही असते की.. जो तो सांगतो तिला ना मला आवडतात तशीच सेम टू सेम अंडी खायला आवडतात.. आणि इकडे आपल्या हिरोच्या डोक्यात ट्युब पेटते… की तिला बिचारीला स्वतःचे मतच नसते.. प्रेमात पडताच ती त्याला जसे आवडते तसे वागू लागते.. तिला तेच सगळे आवडू लागते जे त्याला आवडते.. पण हे कृत्रिम वागणे ती कोठवर निभावणारं..

हे सगळे पाहून ना माझे विचारचक्र ज्या वेगाने धावायला लागले त्याला अगदी जसेच्या तसे इथे उतरवतेय आज…

किती छोटीशी गोष्ट.. मला स्वतःलाच काय खायला आवडते एवढेही माहित नसणे .. तसे बघायला गेले तर अगदीच सामान्य गोष्ट.. कारण असे बरेच जण आपल्या आजूबाजूला दिसतील आपल्याला… लांब कशाला जा.. अगदी स्वतःतच डोकावून पाहू ना.. आपल्याच बद्दल कित्तीतरी गोष्टी माहित नसतात आपल्याला… तसं पहायाला गेलं तर अगदी नेहमी ऐकतो आपण की या जगात आपले आपणच असतो आपले खरे सोबती..

पण मला ना नेहमी प्रश्न पडतो खरचं असतो का आपण स्वतःचे एक सच्चे सोबती.. ओळखतो का आपण स्वतःला पूर्णपणे?? कदाचित काहींसाठी हे उत्तर हो असेल ही.. पण बहुतांश लोकांचे उत्तर नाही असेल.. हो ना??? असे होते ना कधी कधी… कधी कधी का बर्‍याचदा.. कोणीतरी विचारते .. काय ग कसला ड्रेस आणू तुला वाढदिवसाला.. आपलं सोज्वळ उत्तर “अगं आणं तुला आवडेल तो..मला आवडेल तू आणलेले.. ” कधी आणखीही प्रश्न.. “आज अगदी तुझ्या आवडीची भाजी करू..सांग कुठली करू.. ” मला ना कुठलीही चालते.. माझे नखरे नाहीत ग बाई काही.. किती गुणी बाळ.. पण हळूहळू या कौतुकामुळे आपले मत न बनवणेच कसे चांगले असे वाटायला लागतात.,.. आणि मग मोठ्या प्रश्नांना बगल कशी द्यायची याचे ट्रेनिंग सुरू होते आपल्या मनाला आपल्याकडूनच.. हळूहळू आपण कसे आहोत याच्या पेक्षा आपण कसे असलेले समोरच्याला आवडेल तसे वागायला सुरुवात होते.. कुठे तरी स्वतःला हरवत जातोय आपण याची जाणीवच होत नाही.. नुसता मनाचा गोंधळ सुरू होतो मग.. कुठलाही निर्णय नकोच की घ्यायला असे काहीसे वाटू लागते..

माझी ना एक मैत्रिण आहे.. खूप हुशार अगदी ब्रिलियंट कॅटॅगरीत बसणारी.. नुकतेच तिचे लग्न झाले.. मी तिच्या घरी गेलेले एकदा.. तर मला विश्वास बसेना असं तिचं काहिसं वागणं..अतिशय बावळट भाव चेहर्‍यावर आणि भिरभिरी नजर.. सहज तिला म्हटले अग काय ग अशी का तू.. त्यावरचे तिचे उत्तर खरचं मला अचंबित करून गेले.. “अगं उगाच मी फार हुशार आहे हे कशाला दाखवा..त्यांना नाही आवडत आपलं सामान्य असलेलचं बरं .. ”

ही मुलगी तिचे सगळे व्यक्तिमत्त्व बदलायला निघाली होती…. का करतो आपण असे.. मान्य की समोरच्याला छान वाटेल असे वागावे.. अगदी मान्य… पण म्हणून स्वतःतील स्वतःला संपवून??? स्वतःची ओळख आपण स्वतःपासूनच हिरावून घेतोय आपण.. मग आपण होतो तरी कसे हेच कळेनासे होते..

असं कधी होतं का हो तुमचं?? कधी कधी ना आरश्यासमोर उभे राहून स्वतःकडेच टक लवून पहाताना एकदम अनोळखी वाटायला लागते.. एखाद्या गर्तेत असल्यासारखे.. काही तरी शोधतायत आपले डोळे असे वाटायला लागते.. पण काय तेच कळतं नाही.. काही तरी हवे असते पण आपल्याला काय हवे आहे हेच कळतं नाही.. काही तरी शोधत असतो.. काय ते माहित नाही .. कशासाठी ते ही माहित नाही.. कसलीशी जळमटं जाणवतात मनावर.. मळभ आल्यासारखे वाटते एकूणच रोजच्या जगण्यावर.. खरं तरं.. सगळं चांगलं तर चाललेल असतं.. शिक्षण,नोकरी,संसार..सगळं सगळं लौकिकार्थाने उत्तम तरीही कसलासा शोध घेत असते मन.. शुन्यातच..

पण या शुन्यातूनच सापडेल काही तरी नक्की हा दुर्दम्य आशावाद पाहिजे मनात.. मग कदाचित या चाचपडणार्‍या मनाला हाती काही तरी लागेल.. पण त्यासाठी आधी आपल्याला काहीतरी शोधायचे आहे हे तरी जाणवले पाहिजे.. मग हे काहीतरी म्हणजे काय हे हळूहळू ध्यानी येईलही आपल्या.. आणि एकदा ते काहीतरी आहे तरी काय हे कळले की सारा रस्ताच मोकळा होईल की हो..मग फ़क्त प्रयत्न अथक प्रयत्न.. ते साध्य करण्याचे..

 

टॅग्स: