RSS

Category Archives: फिल्मी चक्कर

एक भ्रमंती फिल्मी दुनियेची

Rockstar


म्हणतात ना..मोठं व्हायचयं? काहीतरी बनायचयं? स्वप्न पहा.. भरपूर स्वप्न पहा.. त्यांनी झपाटून जाध्यास घ्या त्यांचा..तुमच्या प्रत्येक श्वासात त्याचे भारलेपण जाणवू द्या..मग नक्की, अगदी नक्की यश मिळालचं म्हणून समजा..अशाच एका ध्यासाची आणि थोड्याशा भरकटलेल्या भारलेपणाची कथा म्हणजे रणबीर कपूरचा नवा चित्रपट रॉकस्टार….

अगदी प्रथमदर्शनी frame पासून खिळवून ठेवणारा… तसं पाहिलं तर कथेत फारसं नावीन्य किंवा फारसं वेगळेपण नक्कीच नाही..पण चित्रपट पहाताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवत रहाते आणि ती म्हणजे प्रेक्षकांना काहीतरी चांगलं देण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न..फक्त तिकीट खिडकीवर लक्ष न ठेवता एक चांगला चित्रपट बनवण्याचा केलेला अतिशय प्रामाणिक प्रयास… दिग्दर्शक, अभिनेते, संगीतकार अगदी सगळ्या सगळ्यांचे अतिशय मनापासून केलेले काम जाणवत रहाते..

कथा साधीशीच.. सुखवस्तू कुटूंबातला एक मुलगा, जनार्दन जाखड.. आयुष्यात rockstar होण्याच्या ध्येयाने पछाडलेला..पण नक्की कसा करायचा हा प्रवास याबद्दल कमालीचा गोंधळलेला.. तुझ्या आयुष्यात दुःखच नाही त्यामुळे तुझी कला बहरत नाहीये.. असल्या कसल्याशा सल्लावर विचार करून करून थकलेला..आणि मग प्रेमभंग हेच एकमेव दुःखाचं कारण होवू शकतं हा साक्षात्कार झाल्यावर, त्याच्या आयुष्यात नकळत आलेली हीर, एक स्वछंदी मुलगी, त्या पाठोपाठ या जनार्दन जाखडचा झालेला J.J. , त्याचा यशाच्या दिशेने झालेला प्रवास, आणि मिळालेली प्रसिद्धी पचवता न आल्याने एकीकडे टोकाची लोकप्रियता आणि दुसरीकडे अतिशय कोलाहलाने भरलेले मन, परिणामी डागाळलेली प्रतिमा ..यांचं अविरहत चाललेलं द्वंद्व..

एक अतिशय mature दिग्दर्शनाचा आणि तितक्याच ताकदीच्या अभिनयाचा उत्तम नमुना आहे Rockstar.. इम्तियाज अलीचा ठसा चित्रपटाच्या हर एका प्रसंगामध्ये जाणवत रहातो.. आजपर्यंत बर्‍याच हिंदी चित्रपटात एक विशिष्ट कथा असते आणि हर एकवेळी तिचा एक विशिष्ट शेवट घडणे अपेक्षित असते, म्हणजे जर प्रेमाचा त्रिकोणबिकोण दाखवायचा असेल तर, एकाला प्रेम मिळणे, आणि दुसर्‍याने त्याग करणॆ किंवा सरळ सरळ मरणे असे काहीसे अपेक्षित असतेपण इथे कथा साचेबद्ध होत नाही.. तर एक प्रवास बनते.. यात एक ठराविक शेवट नाही.. हिरो/हिरोईनचे एकत्र येणे नाही, प्रत्यक्ष मरणं पण नाही.. नायकाचं वर्तन/प्रतिमा पूर्णपणे बदलून त्याचं संत होणं असलं काही नाही.. किंबहुना..पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट असं काही नसतं याची ग्वाही मात्र नक्की आहे..

संगीताबद्दल काय बोलणार.. रेहमान ही एक जादू आहे.. भुरळ पडणारच…. पण अगदी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो…. ” फाया कुम या गाण्याचा..एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो रेहमान आपल्यालाखरचं रेहमान हे एक अजब रसायन आहे.. इतकं भिडणार संगीत हा दर एका चित्रपटात कसा काय बुवा देवू शकतो… मोहित चौहानसुद्धा अप्रतिम… अतिशय सच्चा सूर जाणवत रहातो याच्या आवाजातून

पण खरी कमाल केलीय ती.. रणबीर कपूरने.. अप्रतिम अभिनय.. सुरवातीचा काहीसा बुजरा, घाबरट, गोंधळलेला रणबीर, हीरबरोबर धमाल करणार, उत्फ्फुल रणबीर, त्याच्याही नकळत हीर मधे गुंतत जाणारा.. घरातल्यांनी घराबाहेर काढल्यावर दर्ग्यात रहाताना खर्‍याअर्थाने संगीताचा, गाण्याचा साक्षात्कार झालेला रणबीर, यशस्वी, मनस्वी, आणि तरीही हळवा रणबीर..अप्रतिम..केवळ अप्रतिम.. Rockstar चं attitude, त्याचं वागणं, बोलणं अगदी नैसर्गिक..

हीर आपल्यामुळे कोमात जातेय हे कळल्यावर त्याची झालेली तगमग, आणि अगदी त्याचं वेळी पोलिसांनी त्याला केलेली अडवणूक, या सगळ्याने सैरभैर झालेला J.J. असा काही वठवलाय त्याने, की हा केवळ ३४ वर्षे आहे या फिल्मी दुनियेत यावर विश्वासच बसत नाही

फारसा वेगळा नसूनही वेगळा वाटणारा हा Rockstar अगदी must watch….

 

फॉरेस्ट गम्प.. – एक अनुभव !!


एक अतिशय नितांत सुंदर सिनेमा पाहिला मी गेल्या आठवड्यात.. आता नाव सांगितलं ना तर अत्यंत लेट करंट लेबल बसण्याची दाट शक्यता आहे..हा एवढा मोठा धोका असूनही, तो अनुभव कथन करावासा वाटतोय .. खरचं हा सिनेमा केवळ सिनेमा नाहीच आहे मुळी..तो एक अनुभव आहे.. हा सिनेमा आला १९९४ मध्ये.. तेव्हा आपली अवघी हिंदी सिनेसृष्टी हम आपके है कौन मय होती.. अर्थात मी पण.. आणि या अप्रतिम कलाकृतीकडे लक्ष जायला तब्बल १५१६ वर्ष जावी लागली.. तर आता नमनाला घडाभर तेल पुरेतर सिनेमा आहे फॉरेस्ट गम्प..

अरे काय भन्नाट चित्रपटटॉम हॅन्क्स हा अतिशय संवेदनशील आणि चतुरस्त्र अभिनेता आख्खा चित्रपट स्वतःच्या अभिनयच्या बळावर व्यापून टाकतो..

सुरुवात होते तीच इतकी मनाची पकड घेणारी.. आपला हा फॉरेस्ट गम्प वाट पाहतोय एका बसची.. आणि शेजारी बसचीच वाट बघत बसलेल्या एकीशी तो अचानक संभाषण सुरू करतो आणि विषय तर काय तर पायतले बूट.. दोन क्षण कळेनासे होते.. की हा नक्की काय बोलतोय

लगेच सीन दुसरा.. एक लहानगा मुलगा बसलाय एका बेंचवर बसचीच वाट बघत..

या मुलाकडे पहाताना सर्वात प्रथम लक्ष जाते ते त्याच्या पायांकडे.. कसल्याश्या लोखंडी आधाराने जखडलेले त्याचे पाय, आणि चेहर्‍यावरचे त्याचे निरागस भाव.. आणि वार्‍याबरोबर उडत येणारे एक पीस.. सगळा माहोलच आपण आता या फ़ॉरेस्ट गम्पच्या विश्वात रंगून जाणार आहोत अशी ग्वाही देत रहातो हा प्रसंग..

हळूहळू.. अगदी अलगद कथा उलगडत जाते.. पायाने अधू असणारा (खरं तर त्याच्या पाठीच्या मणक्यात काहीतरी दोष असतो ज्यामुळे.. तो नीट चालू शकत नसतो) हा फॉरेस्ट आणि त्याची आई दोघेच रहात असतात..ग्रीनबो , अलाबामामधे.. फॉरेस्ट फक्त पायानेच अधू नसतो तर त्याचा I.Q. सुद्धा सर्वसामान्यांपेक्षा कमी असतो..पण त्याची आई सतत त्याला सांगत रहाते..की तु वेगळा नाहीस..जे जे तुझ्या वयाचे तुझे मित्र करू शकतात ते सगळे तु सुद्धा करू शकतोस.. त्याच्या मनावर हे ती अगदी सोप्या भाषेत आणि निरतिशय प्रेमाने हे बिंबवत रहाते

मित्र म्हणावे तर असे कोणी नसतेच फ़ॉरेस्टला.. पण एक मैत्रिण मात्र मिळते.. स्वतःला जणू पक्षी होवून खूप खूप दूर उडून जाता यावं म्हणून प्रार्थना करणारी.. फ़ॉरेस्टला मनापासून साथ देणारी.. आणि त्याच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर अमुलाग्र बदल घडवून आणणारी जेनी..

या दोघा लहानग्यांना एकदा त्यांचेच काही मित्र त्रास देतात.. त्यांच्यापासून बचावासाठी फॉरेस्टला ती जोरात ओरडून सांगती रन फॉरेस्ट रन.. ” साधं नीट चालता न येणारा हा मुलगा.. आधी अडखळत, धडपडत..पळायला लागतो.. त्याच्या पायाची बंधन गळून पडतात.. जणू नवीन आयुष्य मिळत त्याला ..आता जिथं जायचं तिथं हा पठ्ठ्या पळतचं जायला लागतो.. वयाची ८१० वर्ष बंधनात घालवल्यावर मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आनंत अवर्णनीय असतो त्याच्या लेखी..

असेच वर्ष उलटतात.. केवळ त्याच्या अतिशय वेगाने धावण्याच्या या गुणामुळे.. त्याचं महविद्यालयीन शिक्षण अतिशय सुखकर होत.. पुढे हा सैन्यात जातो.. व्हिएतनाम युद्धात लढतो, आणि तिथे प्रवेश होतो त्याचं आयुष्य पुन्हा बदलून टाकण्यात महत्वाचा वाटा असणार्‍या दोघांचा..एक त्याचा कमांडिंग ऑफिसर डॅन आणि एक जवळचा मित्र बेंजामिन ब्लू.. उर्फ़.. बब्बा.. (bubba) .. हा त्याचा जिवश्चकन्ठश्च मित्र बनतो.. हा bubbaभलताच मजेशीर अवलिया असतो.. हा अहर्निश विचार करत असतो.. श्रिम्पचा..त्याला एक मोठी बोट बांधायची असते.. आणि आयुष्यभर श्रिम्प पकडत समुद्रकिनारी रहायचं असतं..फॉरेस्ट त्याला वचन देतो या युध्दानंतर मी तुला तुझी बोट बांधायला मदत करेन..

पण नशीबाला हे मान्य नसतं.. bubba.. युध्दात मृत्युमुखी पडतो.. आणि फॉरेस्ट त्याच्या वेगाने पळण्याच्या जोरावर पुन्हा एकदा.. स्वतः तर वाचतोच पण.. लेफ़्टनंट डेन सहीत त्याच्या अनेक सहकार्‍यांना वाचवतो..

युद्ध संपत..ठरल्याप्रमाणे हा श्रिम्पसाठी बोट बांधतो सुद्धा आणि बोटीचं नाव जेनी… , डेनच्या मदतीने यशस्वी सुद्धा होतो.. यशस्वी होवून घरी परततो.. दरम्यान त्याची आई वारते.. जेनी त्याला लग्नाला नकार देते.. हा अशाच मनाच्या एक अवस्थेत पळायला सुरुवात करतो , आणि पळतच रहातो.. थोडेथोडके दिवस नव्हे तर तब्बल तीन वर्ष आणि काही महिने.. त्याला अनेकजण साथ द्यायला धावू लागतात,,

मग अचानक तो थांबतो, घरी परततो.. जेनीला भेटतो, आणि तिच्या बरोबर असणार्‍या आपल्या मुलाला, तिच्याशी लग्न करतो, अतिशय अल्प सहवासात तिच्या आजारपणात तिला साथ देतो, तिच्या पश्चात अतिशय प्रेमाने मुलाला जपतो, तो आपल्यासारखा नसून अतिशय हुशार आहे या कल्पनेनेच हुरळून जातो

या एकाच माणासाच्या आयुष्यात किती घटना घडतात.. चित्रपट बघताना जाणवलचं होतं.. पण आज लिहिताना मी हा चित्रपट पुन्हा जगला.. किती नानारंगी रंगानी रंगलं होतं त्याचं आयुष्य..

केवळ मन लावून आणि श्रद्धेने काम करण्याच्या एका गुणामुळे.. कुठल्या कुठे पोचला फॉरेस्ट..बुद्धी नाही म्हणून हिणवला गेलेला फॉरेस्ट कुठे आणि हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत कल्पनेपलिकडे यश मिळवणारा फॉरेस्ट कुठे.. का आपण फक्त पुस्तकी बुद्धीला महत्व देत रहातो अजून ..फार फार प्रकर्षाने जाणवलं हे.. एक सच्चा मित्र, सच्चा प्रेमी, अतिशय प्रामणिक सहकारी, एक हळावा मुलगा, फार फार शूर, धाडसी फॉरेस्ट समोर आला या चित्रपटातून..

आता टॉम हॅंक्सबद्दल बोलण्याची माझी कुवतच नाही.. काय सुंदर अदाकारी.. काय सहजसुंदर अभिनय, त्याने भुमिकेचे bearing असे काही पकडले आहे ना..जणू तो आणि फक्त तोच फॉरेस्ट साकारू शकतो.. जगलाय तो ती भुमिका.. चित्रपट बघायच्या आधी मला वाटलेले, की खूप रडका आणि depressing असेल हा चित्रपट.. पण अतिशय हलक्याफुलक्या शैलीत मांडलाय सगळा प्रवास.. एक एक संवाद आठवून आठवून हसत राहवे, विचार करावा.. रंगून जावे

खरचं, हा नुसता पहाण्याचा चित्रपट नव्हेच.. हा एक प्रवास आहे, एक अनुभव आहे.. एक निरतिशय सुंदर अनुभवअगदी प्रत्येकाने अनुभवायलाच हवा असा अनुभव !!!…

 

फिल्मी चक्कर..


गेले काही दिवस २-३ वेगवेगळ्या पोस्टस लिहून अर्धवट ठेवायचे काम मी अतिशय नेटाने करतेय… आज आता आणि एक नवी पोस्ट लिहायला सुरुवात करतेय .. पण आज मात्र ही नक्की पूर्ण करायची असं अगदी पहिल्या ओळीपसून घोकतेय.. कारण.. कारण आज ना मी माझ्या सर्वात आवडत्या विषयावर लिहिणार आहे… मी माझ्याबद्दल सांगतानाच म्हटले नव्हते का.. की मी ना तद्दन (की अट्टल म्हणू) फिल्मी आहे.. जाम आवडते मला सिनेमा पहायला… आणि खास करून लव्हस्टोरी..

 मला ओळखणारे सगळे मला सिनेमांचा डाटाबेस म्हणतात.. का ते कळेलच तुम्हालाही…

एकदा ना ईंजिनीरिंगला असताना, माझ्या रूममेटनी (अर्थातच ती ही इतकीच फ़िल्मी आहे हे तुम्ही सुज्ञ वाचकांनी ओळखलेच असेल नाही.. 🙂 ) फ़िल्मफ़ेअर मासिक आणले होते.. अहाहा.. खजिना खजिना म्हणतात तो हाच असेच वाटले आम्हाला..

सारं मासिक आम्ही वाचून काढले.. आणि माझे तर ते मुखोद्गत झाले होते , इतके.. की माझ्या मैत्रिणीने त्यावर माझी तोंडी परिक्षा घेतली.. आणि मी पैकीच्या पैकी गुण मिळवून त्यात उत्तीर्ण झाले.. तर असे आहे माझे फ़िल्मी ज्ञान …

बापरे.. लिहित काय होते आणि कुठे पोचले.. असेच होते.. सिनेमांबद्दल लिहायला लागले की भरकटायला होते…असो.. आता गाडी आणते मूळ मुद्द्यावर…

तर कुठे होते मी.. हां.. तर माझ्या या सिनेमा प्रेमाचे बाळकडू मला ना माझ्या बाबांकडून मिळाले.. ते स्वतः खूप सारे सिनेमे पहायचे..

 दिलीप कुमार त्यांचा अगदी पेट्ट हिरो.. त्याचे सगळे डायलॉग यांना तोंडपाठ.. मुघल-ए-आझम बघावा तर माझ्या बाबांबरोबर..

इतकी सखोल महिती की काही विचारू नका.. अगदी प्रत्येक संगितकारा पसून, दिग्दर्शकाला आलेल्या अडचणींपर्यन्त.. सगळं कसं स्पष्ट..

मी त्यांना चिडवायचे तुम्हाला अगदी स्पॉट्बॉय सुद्धा माहित असतील…

सो..जशी राजा तशी प्रजा या अनुशंगाने माझे सिनेमा प्रेम पाळण्यातच दिसले असावे… 🙂 मी ना बरेचसे सिनेमे माझ्या बाबांबरोबर जाऊन बघितलेत..अजून मैत्रिणी-मैत्रिणी सिनेमे पहायचा ट्रेंड सुरू व्हायचा होता.. आमच्या कराडमधले जे सगळ्यात चांगले theatre होते ना त्याचे मालक माझ्या बाबांचे बालमित्र त्यामुळे कुठला ही पिक्चर कुठपासून आणि कुठे ही बसून बघायची मुभा होती.. अर्थात बाबा बरोबर असतील तरच.. 🙂 मी अभ्यासात हुशार असल्याने आणि ते सगळे अभ्यास वगैरे व्यवस्थित पार पाडत असल्यामुळे या माझ्या आवडीला बाबांनी कधी हरकत घेतली नाही.. आणि मग ही आवड चांगलीच वृव्द्धिंगत होत गेली…परीक्षा संपली की मी आणि बाबा जायचो सिनेमाला… किती बघितले असे .. याची गणतीच नाही.. 🙂

आज ना मला अश्याच काही मनात अगदी घर करून राहिलेल्या सिनेमांबद्दल सांगावसे वाटतेय.. बरेचसे तुम्ही पाहिले ही असतील.. मला खूप खूप आवडणारे हे काही चित्रपट…

सुरुवात तर माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटाने केली पहिजे.. आणि तो म्हणजे सुजाता.. खरं हा मी माझ्या आत्याकडे सुट्टीत रहायला गेलेले तेव्हा टीव्हीवर पाहिला.. सुरुवातीला नको नको म्हणत.. पण नंतर.. … खरं तर मी हा सिनेमा पाहिला तेव्हा मी आठवीत असेन..

कितीसा कळला तेव्हा कोणास ठाऊक..पण आता दोनेक वर्षांपूर्वी त्याची सीडी खूप धडपड करून (त्या हकिकती वर स्वतंत्र पोस्ट होईल) मिळवली. आणि किती पारायणे केली त्याची मग…  

इतका सहज अभिनय, कुठूनही आपण अभिनय करतोय याची कल्पना ही न देता..सुरेख काम केलय नुतननी..

काय दिसलीय ती.. सुरेख.. तिच्यापुढे आजच्या सगळ्या नट्या काहीच नाही..

प्रत्येक संवाद जणू तिच्यासाठीच लिहिला गेलाय..

अतिशय बोलके डोळे.. तिचा तो शालीन चेहरा..आणि किणकिणता आवाज.. बघत रहावे तिच्याकडे असे वाटते..

कमालीचा सोशिकपणा पण तो कुठेही मेलोड्रॅमॅटीक न होवू देता फ़ार फ़ार सुंदर वठवलाय नुतनने..

सुनील दत्त बद्दल तर काय लिहायचे..

त्याचे ते तिच्यावर मनापासून प्रेम करणे आणि इतक्या सहजतेने तिचे सत्य स्विकारणे..

तिला समजावताना तिला सांगितलेली ती गांधीजींची गोष्ट..

फ़ार सहज आणि अतिशय नैसर्गिक.. कृत्रिमतेला कुठेही वावच नाही..

मला तर त्यातील ललिता पवार पण फार आवडल्या.. त्यांनी साकारलेली आजी एकदम पटून जाते अगदी त्या प्रेमाच्या विरोधी पार्टीत असल्यातरी…

त्यातले जलते है जिसके लिये गाणे तर अजरामर.. आक्ख गाणं दोघांच्या फक्त चेहर्‍यावर कॅमेरा आहे आणि काय लाजवाब मुद्राभिनय ..वा वा….

साधी सोपी गोष्ट.. ब्राम्हण कुटूंबात वाढलेली पण जन्माने दलित असणारी मुलगी आणि उच्चभ्रु कुटूंबातला मुलगा यांची प्रेमकहाणी..

 हा विषयच त्याकाळी धाडसी.. पण इतकी साधी सोपी मांडणी.. आणि एकदम बढिया दिग्दर्शन.. बिमलदांची बातच काही और…

खरं तर हा सिनेमा माझ्या पिढीचा नव्हे.. पण तरीही आपला वाटणारा.. आणि त्याच्या साधेपणातच सारे धरून ठेवणारा म्हणून खास…

असाच आणि एक साधा सरळ सिनेमा म्हणजे.. मिली.. 

जया आणि अमिताभ इतके आपल्यातले वाटतात..

कुठेही अभिनयाचा अतिरेकी अभिनिवेष नाही..

जयाचं ते मोकळं हसू..अमिताभचं ते स्वतःशीच लढणं,

त्याचा तो दुष्ट राक्षस आणि तिचं ते आपल्या नावाची कथा सांगणं..

त्याच्या मनातील ती उदासिनता तिने हळूहळू त्याच्याही नकळत काढणं,

तिच्यासाठी , तिच्या हास्यासाठी त्याचे ते स्वतःला बदलणं,

आपल्या लेकीच्या आजरपणाने मनाने खचलेले पण चेह‍र्यावर हसू कायम ठेवणारे अशोककुमार..

सगळं कसं एका संपूर्णत्वाला आलेल्या चित्रसारखे.. ह्र्षिकेश मुखर्जीं बद्द्ल तर बोलू तितके कमीच आहे…

 त्यांचा हर एक चित्रपट एक एक जीवनाचे साधेच असेल पण तत्वज्ञान सांगून जातो..

पूर्वेतिहासामुळे एक मनातल्या मनात कुढणारा नायक, आयुष्याचा मनमुराद आनंद घेणारी पण हाती चिमुकला वेळ उरलेली नायिका..

तिच्यावरचे सगळ्यांचेच प्रेम, आणि तिचा त्याच्या सच्चेपणा वरचा विश्वास इतका सुरेख टिपलाय ह्र्षिकेश मुखर्जींनी.. की काय दाद द्यावी…

मैने कहा फुलोंसे.. किती वेळा ऐकलं तरी नव्याने उर्जा देणारे गाणे.. सुरेख.. दुसरा शब्द नाही…

 या सिनेमांनी ना आयुष्य सुंदर केल असं वाटत..मला ना यांचा साधेपणा फार फार भावला…

त्यातला सच्चेपणा आणि भावुकता आज इतक्या वर्षांनीही मनाला तितक्या आवेगाने भिडते.. अ

जूनही बरेच सिनेमे राहिलेत लिहायचे.. पण तुर्तास एवढेच ठीक आहे.. कारण..

या पोतडीत अजून दडलय़ काय हे शोधण्याआधी मलाच पुन्हा एकदा हे दोन्ही चित्रपट पहावेसे वाटतायत..

सो मंडळी… उरलेले ब्रेक के बाद.. 🙂