RSS

Category Archives: असचं मनातलं काही-बाही

असचं मनातलं काही-बाही

खिडकी


प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी मनासारख्या जुळून येतात.

आमच्या अपार्टमेंट मध्ये अशीच एक माझी आवडती जागा आहे. आमच्या लिविंग रूम मधली भली मोठी खिडकी. त्या खिडकीला लागून आम्ही एक छोटासा सोफा ठेवलाय. का कुणास ठाऊक पण त्या खिडकीचं, त्या सोफ्याचं आणि माझं असं एक वेगळचं भावविश्व तयार झालंय.

पहाटे जिम वगैरे आटपून घरी आल्यावर, वाफाळत्या गरम कॉफीचा कप घेऊन इथे बसायला मला प्रचंड आवडतं. एकतर अगदी नुकतीच उजाडायला सुरुवात झालेली असते, वर्कआऊटच्या adrenaline rush मुळे की काय पण जाम productive, positive असं काही बाही वाटत असतं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अजून घरात तशी शांतता असते; भले मग ती वादळापूर्वीची का असेना पण मुलांच्या चिवचिवाटाला सुरुवात न झाल्याने खिडकीबाहेरून येणारे पक्षांचे आवाज अगदी सहज ऐकू येत असतात. त्यातून हातात कॉफीचा कप असेल तर विचारूच नका, सुख सुख म्हणतात ते हेच काय !

रोजची वेगळी सकाळ अनुभवलीय मी इथे बसून. इनमिन १० मिनिटांचा खेळ सगळा पण रोजच्या to-do लिस्ट पासून ते अगदी या लेखापर्यंत सगळ्या गोष्टींची साक्षीदार आहे ही जागा. आपण लहानपणी शिकलॊय की, पृथ्वीचा आपण राहतो तो भाग सूर्यासमोर आला की दिवस होतो, खरंतर किती रुटीन प्रोसेस पण खरं सांगू या खिडकीतून दिसणारा सूर्योदय कधी रुटीन वाटलाच नाही मला. रोज निराळा !

कधी शुभ्र ढगांमधून हळूवार उमटणारं ते केशरी सूर्यबिंब. आता अंधार होता असं वाटत असताना हलकेच उमटू लागणारी केशरी छटा. लांबवर असणाऱ्या झाडांचे शेंडे स्पष्ट करत जाणारी उजेडाची तिरीप इतकी सुंदर की असे वाटावे इथून हलूच नये.

पण दुसऱ्याच दिवशी दूरची झाडेच काय पण अगदी समोरची घरेही दिसू नयेत इतके धुके आणि मग सूर्योदयसुद्धा एखाद्या आळशी मुलासारखा फक्त चादरीबाहेर डोके वर काढून आपण जागे असल्याची ग्वाही देणारा.

या खिडकीने माझ्याबरोबर असे किती अगणित सुंदर क्षण पाहिलेत. बाहेर धो धो कोसळणारा पाऊस हा तर माझ्या प्रचंड जिव्हाळयाचा विषय.पावसाने हवेत आलेला गारवा, बोचरा पण तरीही हवाहवासा वाटणारा. समोर दिसणाऱ्या झाडांना जागोजागी दिसू लागलेली कोवळी, ताजी ताजी पोपटी पालवी. सगळं कसं नजरेत साठवून ठेवावं असे.

का कुणास ठाऊक, पाऊस जितका जवळचा वाटला तितका स्नो नाही कधी वाटला. अमेरिकेत आल्यावर सुरुवातीचं वर्ष जरा वाटलं आकर्षण स्नोचे कारण त्याआधी स्नो पहिला होता, तो फक्त यश चोप्रांच्या movies मध्ये! पण जसजशी वर्षे गेली तसा हा स्नो भेटतं तर राहिला दरवर्षी पण त्याच्याशी दोस्ती झाली नाही कधी हेच खरे. हे सगळे ऋतू पाहिलेत मी याच माझ्या लाडक्या ठिकाणी बसून आणि मग कधी ही जागा माझ्या रोजच्या रुटीनचा भाग होऊन गेली तेच नाही कळले मला.

गेल्या समरमध्ये रोज सकाळी एक आजी-आजोबा फिरायला जाताना दिसायचे. आजोबा जरा जास्त थकलेले, त्यामुळे आजी त्यांचा हात धरून सावकाश चालत असायच्या.त्यांची माझ्या बिल्डिंगसमोरून जाण्याची वेळ कधीही बदलली नाही. पण एक दिवस अचानक दोघेपण दिसले नाहीत. आणि मग एक दिवस एकट्या आजी दिसल्या, का कुणास ठाऊक पण मला त्या जरा जास्त थकलेल्या वाटल्या. काळजात चर्रर्र झाले माझ्या, काय झाले असेल आजोबांना? एकदा वाटले विचारावे आजींना , पण खरं सांगू नाही धाडस झाले माझं. पुढचे २ दिवस सतत मनात येत राहिले की आज असतील का आजोबा सकाळी ? शेवटी २-४ दिवसांनी पुन्हा दोघे एकत्र दिसले आणि काय बरं वाटलं म्हणून सांगू.

माझी ती खिडकी, तो सोफा, बाहेर दिसणारा निसर्ग, दिसणारी माणसं आणि माझं असं एक आगळंच विश्व तयार झालंय. कितीदा तरी असं झालय की मला वाटायचं, नको आज जिम, कंटाळा आलाय, उगीचच दमल्यासारखे झालंय थोडक्यात काय तर आळस आलाय पण नेमकं अशा वेळीच एखादा अनोळखी चेहरा भल्या पहाटे जॉगिंगला जाताना मला इथूनच दिसायचा आणि कसे काय माहित पण मीही नकळत जिमकडे वळायचे.

मनातल्या असंख्य वादळांना अलगद शमवण्याचे सामर्थ्य दिलाय मला माझ्या या जागेने. ही १० मिनिटाची शांतता कितीदा मनातला गुंता सोडवायला कामी आलीय माझ्या. ज्या गोष्टीचा आपण इतका विचार करतोय ती गोष्ट किती सहज आणि सोप्पी आहे हे समजायला मदत केलीय मला या जागेने. हा वेळ, ही जागा माझी आहे, माझ्या एकटीची, रोजची प्रचंड घाई गडबड सुरु होण्यापूर्वी आणि बाकीच्यांसाठी काहीबाही कारण्यापूर्वीची, माझी हक्काची १० मिनिटे ! कितीदा माझ्यातल्या मला शोधायला या जागेने, या क्षणांनी मदत केलीय. किती आठवणी, किती संकल्प, किती हळवे क्षण पाहिलेत, अनुभवलेत मी इथे. माझ्या या लहानश्या परिघात !

 

निरगाठ..


एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर धाग्यांच्या बरोबरीने..तर कधी त्यांना छेदत..गुंफण घालत..गिरकी घेत..कधी स्वतःच्याच तालावर विहरत..रंगून जाऊन …स्वतःला या महावस्त्राच्या विणीत अडकवून घेत चाललाय वेडा..

किती वर्षांचा प्रवास .. कुठे जायचे ठाऊकच नाही.. तरी पण सगळ्यांबरोबर स्वतःला अडकवत चाललाय वेडा… या विणीत गुंफुन घेण्यासाठी कधी स्वतःलाच हलकीशी गाठ मारून घेतोय.. स्वतःहूनच किती पाश, किती बंध निर्माण करतोय.. अनेक अनेक गाठीतून वेगळा ओळखताही येऊ नये इतका बेभान गुंतत चाललाय.. खरचं एक वेडा अवलिया….

पण… पण या गाठी हळूहळू निरगाठी बनताहेत का..त्याला कायमचं त्या वस्त्रात अडकवून टाकणार्‍या निरगाठी… किती खोल…किती आत.. कुठे कुठे आहे कुठे त्याचे स्वतःचे अस्तित्व..ओळखू पण येत नाहिये..कसं आवळून टाकलयं त्याला या बाकीच्या सगळ्या धाग्यांनी…त्यांच्या वेढ्यांनी.. त्यांच्या गाठींनी.. कसले हे पाश..कसली नसती जबाबदारी..नुसता गोंगाट ..नुसता कोलाहल माजलाय सगळा… आणि हा स्वतः कसा इतका रमलाय या बंधनात..

अरे वेड्या मुक्त हो..या बंधनांसाठी का जन्म झालाय तुझा.. बघ.. बघ कसा स्वच्छंद आहे मी.. कसले पाश नाही.. कसलीही मोह माया नाही.. कोणी कोणी नाही अडवणारं..स्वैर..मुक्त मी…कुठल्याच वस्त्रासाठी नाही मी..मी फक्त, माझा मी… आठव ना तुझं ते रुप.. ते शुभ्र रुपडं.. कशाला शिरलास या विणीत.. बघ तुझा रंगही तुझा नाही उरला..कसल्या गुंत्यात अडकवलयसं स्वत:ला…कशाला हा गुंता, कशाला शोधायच्या वाटा.. कशाला या असल्या गाठी..चल ऊठ.. बाहेर पड.. दाखव त्यांना तुझं खरं रुप..उसवून टाक तुझी ही वीण.. कळू दे त्यांना तुझी किंमत..फाटलं तर फाटू दे सारं वस्त्रचं..तुला काय घेण की देण..असाचं जग माझ्यासारखा.. निर्बंध…ऊठ.. ऊठ.. तोडून टाक ही निरगाठ.. हो मोकळा हो.. ऊठ..ऊठ…….

सारं कसं शांत.. शांत.. संथ..प्रसन्न.. उबदार आणि अलवार.. काय सुरेख रंग.. इतक्या रंगांच्या उधळणीतूनही लक्ष वेधून घेणारी शुभ्र वेलबुट्टी.. किती सोज्वळ.. किती नाजूक.. सगळ्या रंगांना आधार देणारी.. जपणारी…सगळेच कसे समरसून गेलेत एकमेकात.. सारं कसं एकसंध.. एकरूप.. एकत्र म्हणूनच खर्‍या अर्थे परिपूर्ण वस्त्र.. खरं संपन्न…

काय करू मी तरी.. दिसलीच नाही मला कधी कुठलीच निरगाठ.. ती उसवायला.. बंधनं जाणवलीच नाहीत मला, उभ्या जगण्यात..होते फक्त बंध.. मायेचे.. एकत्र मिळून जगण्याचा आनंद लुटला मी भरभरून.. आणि कसलं आलयं हे एकाकी स्वत्व.. स्वतःला असं एकटं..इतरांपासून वेगळं करण्यात काय मोठं स्वत्व जपणं.. भेटलेल्या हर एक रंगात एकरंग होवूनही टिकलचं की माझं अस्तित्व.. कशाला मग ही मायेची वीण उसवायची.. का तोडायचे पाश, आपल्यांबरोबरचेच. वेगळं होवून माझा माझा नवा गुंता कशाला करायचा.. कसली आलिय मजा या असल्या एकाकी स्वैर जगण्यात.. असल्या निरगाठी सोडवण्यापेक्षा माझा हा प्रेमाचा गुंताच बरा….

 

मनाची दिवाळी…


बघता बघता दिवाळी आली…

.. सगळ्या घराघरांतून फराळाची मस्त तयारी सुरू झाली असेल नाही.. काय सुंदर सुंदर वास ऊठतं असतील.. चकली,चिवडा, लाडू.. अहा रेसगळं कसं नजरेसमोर तरळतयं माझ्याकेवढा उत्साह, एक वेगळचं चैतन्य.. रविवारी वसुबारस.. घरोघरी आकाशकंदील लागतील, पणत्यांनी उजळून जातील अंगणं..उटण्याचा तो खरखरीत पण तरी हवाहवासा वाटणारा स्पर्श, आईनी चोळूनमोळून घातलेली अंघोळ, नवीन कपडे, मग भल्या मोठ्या ताटातून एकत्र केलेला फराळ, गप्पांचे महापूर, फटाके..अरे लै भारीनुसतं आठवूनचं कसलं छान वाटतयंफार भारी….

आपल्याकडचे हे सगळे सणवार मला का आवडतात माहितेय?तर या सगळ्यामधील सर्वात भावणारां घटक काय वाटतो तर, उत्साह, अवर्णनीय उत्साहसगळ्या वातावरणातच एक सळसळता उत्साह असतो.. आणि तोच जास्त भावतो मला.. नाहीतर कित्येकदा आपण तेच तेच दैनंदीन रहाटगाडगे चालवत असतो.. कधी कधी तर वाटते ना, की जणू दोन रात्रींमधे जो दिवस येतो ना, तो समजत पण नाही, इतका डिट्टो सारखा असतो तो आदल्या दिवसासारखाच.. अरे शाळेतलं वेळापत्रक सुद्धा बदलतं दररोज.. पण  आपण तेच ते करत रहातो.. म्हणूनच हा अभुतपुर्व उत्साह खुणावतो मला सारखा.. असं वाटतं रोजचं आयुष्य दिवाळीसारखं झालं तर काय बहार येईल नाही.. पण असं जरतर म्हणून थोडीना ते असं बहारदार होणार आहे.. शेवटी त्या आयुष्याला आकार देणारे आपणचं , मग तो कसा द्यायचा हे पण आपणचं नको का ठरवायला..

आता तुम्ही म्हणालं , ही अचानक एवढ्या गहन विषयात कुठे शिरली? पण ना, मी गेले कित्येक दिवस विचार करतेय.. किती लहानसहान गोष्टींनी कष्टी होतो आपण.. हातात चार काम घेऊन बाहेर पडावं आणि नेमकी आपल्याला हवी ती दुकानचं बंद असावीत, झाले .. जमलं एक जळमटं मनावर, ऑफ़िसमधून येताना लागलं भयानक ट्रॅफिक, वाजवले लोकांनी निरर्थक हॉर्न.. चला नवीन एक जळमट.. नवीन वैताग.. आज जरासा उशीर झाला उठायला, राहिली आज देवपूजा.. जमु द्या एक आणखी जळमट.. आज असं कसं मीठ जास्त पडलं बुवा भाजीत.. जमतचं नाही मला काही..या रे या नवीन जळमटांनो स्वागत आहे तुमचं.. इतका मन लावून कोड केला , आलाच कसा डिफेक्ट.. अरे किती ..अजून एक.. .. आठवडा झाला, घर आवरलचं पाहिजे आता.. किती रे पसारापुन्हा एक नवीन ….

मन दिसेनाच मला , दिसताहेत फक्त ही अशी असंख्य जळमटं.. मगं म्हटलं.. आपण कसं घरात दिवाळी आली की करतोच की आवराआवर.. स्वच्छता.. सगळं कसं लक्ख दिसतं ना मगं.. म्हटलं यावेळी घराबरोबरचं जरा मनाची आवराआवर पण करावी.. भलतीच धूळ, पसारा आणि बरचं काही जमा झालयंजरा झाडून पुसून लक्ख करावं सगळं मन.. एक एक जळमट उचलून भिरकावून द्यायचं ठरवलयं मी.. घरातली रद्दी कशी दर महिन्याला घालून टाकतो आपण.. मग मनात का अशी रद्दी साठून द्यायची

आज अगदी ठणकावून सांगितलयं मी या सगळ्या पसार्‍याला.. बास झालं तुमचं आता.. खूप वेळ मुक्काम ठोकलात..चला आता निघा बघू.. मुळीच आदरातिथ्य होणार नाही आता.. भलतेच चिवट आहेत पण सगळे..  काय पण कारण देऊन तळ ठोकताहेत..  जोरात जोरात ओरडून ऐकायला लावताहेत मला.. म्हणताहेत.. अगं आमचा नुसत्ता उच्चार केलास कुणापुढे तर किती सहानुभुती मिळते तुला.. लगेच कसे सगळे म्हणतात, बिचारी, किती काम पडतं ना तिला.. फार फार कष्ट करावे लागतात.. …किती स्ट्रेस.. किती ताणतणाव आहेत ग बाळे.. कशाला करतेस नोकरी.. का घरातले काम पण….

बास बास कान घट्ट बंद केलेत मी.. नाही नाही ऐकाचचं नाही मला तुमचं, नको मला सहानुभुती.. नाहीच मी बिच्चारी आणि व्हायचं पण नाहिये मला.. लागू दे कष्ट करायला..असू दे सवय माझ्या मनाला, शरीराला कष्टाची.. नाहीच आहे मला भिती .. मी शिकलेय आवडीचं.. नोकरीही स्वतःच्या हिकमतीवर मिळवलीय.. आपल्या आईबाबांनी नाही का केल्या नोकर्‍या ३०३० वर्ष.. कधी केली का कुरबुर त्यांनी? बरं त्यांच्या नोकर्‍या एवढ्या ताणतणावाच्या नव्हत्या असा ही युक्तिवाद करतील काही.. पण खरचं असं होतं का.. माझे आईबाबा दोघेही डॉक्टर..आपण निदान निर्जीव वस्तूंवर काम करतो.. उद्या काही गडबड झाली तर फार फार तर काय होईल.. की ते सॉफ़्ट्वेअर बिघडेल वा तत्सम.. पण डॉक्टर म्हणजे सगळा जिवाशी खेळ..आणि रोजचा..किती ताण असतील या पेश्याचे..पण कधी कुरकुर नाही ऐकली.. अजूनही वयाच्या बासष्ठाव्या वर्षी बाबांना मी तितक्याच उत्साहाने ऑपरेशन करताना पहातेच ना मी. त्यांचीच मुलगी आहे मी .. नाही नाहीच येऊ द्यायचाय छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण स्वतःला..

खड्ड्यात गेला ताण तणाव..सगळ्याला पुरून उरणारे मी आता.. नकोत मला सहनुभुतीच्या कुबड्या..  नकोयत मला ही ओझी.. आणि नाहीच येऊ द्यायचाय असला फालतू ताण.. किती सुंदर गोष्टी आहे आयुष्यात.. किती नवीन काही शिकायचं, किती किती उत्तम उत्तम वाचायचयं..  किती छान जगायचं ..

तर या सगळ्या जळमटांनो या.. वेळ आलीय तुमच्या जाण्याची .. कायमचं भिरकावून देणार आहे मी या नसत्या ओझ्यांना… किती हलकं वाटतयं सांगू.. आणि एकदम स्वच्छ पण… आणि हो उत्साही.. माझ्या मनाची दिवाळी तर सुरू झाली सुद्धा अगदी आज आत्तापासूनच.. अगदी नीटसं, सुगंधी आणि चैतन्यदायी दिवाळी.. माझ्या मनाची दिवाळी…..

ता.क. : तुम्हा सर्वांना आणि तुमच्या उत्साही मनाला ही दिवाळी अतिशय सुख-सम्रुद्धीची, भरभराटीची जावो… 🙂

 

शोधा म्हणजे सापडेल !!


काल मी एक सिनेमा पाहिला.. RunAway Bride.. खरं तरं तुमच्या पैकी बर्‍याच जणांनी तो केव्हाच पाहिला असेल.. कारण सिनेमा येऊन तब्बल एक तप उलटून गेलयं.. पण नेहमीप्रमाणे मी अस्मादिकांना त्याची महती उशीरा कळली… असो..

अहाहा.. काय सुंदर आहे पिक्चर.. अप्रतिम.. ज्युलिया रॉबर्टनी इतकं सुरेख काम केलयं… असो.. त्यावर एक नवीन पोस्ट होईल..

हा सिनेमा पहाताना ना..सारखा एक विचार मनात येत होता.. काय बरं कारण असेल हिचं असं लग्नाच्या वेदीवरून पळून जाण्याचं.. न आवडलेला नवरा..(पण हे एकदा होईल दोनदा होईल.. पण इतके सारखे सारखे.. ) , काही पुर्वेतिहास.. की लग्नाची भीती… कथा साधीच असून उत्सुकता मात्र जबरदस्त लागून रहिली होती.. ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावणारा आपला हिरो तिच्या सर्व माजी होवू घातलेल्या नवर्‍यांना तिला अंडी कशा प्रकारे खायला आवडतात हे विचारत असतो.. ती उत्तरे प्रत्येक जण वेगवेगळे देत असतात ..या उत्तरांमध्ये एक मजेशीर बाब ही असते की.. जो तो सांगतो तिला ना मला आवडतात तशीच सेम टू सेम अंडी खायला आवडतात.. आणि इकडे आपल्या हिरोच्या डोक्यात ट्युब पेटते… की तिला बिचारीला स्वतःचे मतच नसते.. प्रेमात पडताच ती त्याला जसे आवडते तसे वागू लागते.. तिला तेच सगळे आवडू लागते जे त्याला आवडते.. पण हे कृत्रिम वागणे ती कोठवर निभावणारं..

हे सगळे पाहून ना माझे विचारचक्र ज्या वेगाने धावायला लागले त्याला अगदी जसेच्या तसे इथे उतरवतेय आज…

किती छोटीशी गोष्ट.. मला स्वतःलाच काय खायला आवडते एवढेही माहित नसणे .. तसे बघायला गेले तर अगदीच सामान्य गोष्ट.. कारण असे बरेच जण आपल्या आजूबाजूला दिसतील आपल्याला… लांब कशाला जा.. अगदी स्वतःतच डोकावून पाहू ना.. आपल्याच बद्दल कित्तीतरी गोष्टी माहित नसतात आपल्याला… तसं पहायाला गेलं तर अगदी नेहमी ऐकतो आपण की या जगात आपले आपणच असतो आपले खरे सोबती..

पण मला ना नेहमी प्रश्न पडतो खरचं असतो का आपण स्वतःचे एक सच्चे सोबती.. ओळखतो का आपण स्वतःला पूर्णपणे?? कदाचित काहींसाठी हे उत्तर हो असेल ही.. पण बहुतांश लोकांचे उत्तर नाही असेल.. हो ना??? असे होते ना कधी कधी… कधी कधी का बर्‍याचदा.. कोणीतरी विचारते .. काय ग कसला ड्रेस आणू तुला वाढदिवसाला.. आपलं सोज्वळ उत्तर “अगं आणं तुला आवडेल तो..मला आवडेल तू आणलेले.. ” कधी आणखीही प्रश्न.. “आज अगदी तुझ्या आवडीची भाजी करू..सांग कुठली करू.. ” मला ना कुठलीही चालते.. माझे नखरे नाहीत ग बाई काही.. किती गुणी बाळ.. पण हळूहळू या कौतुकामुळे आपले मत न बनवणेच कसे चांगले असे वाटायला लागतात.,.. आणि मग मोठ्या प्रश्नांना बगल कशी द्यायची याचे ट्रेनिंग सुरू होते आपल्या मनाला आपल्याकडूनच.. हळूहळू आपण कसे आहोत याच्या पेक्षा आपण कसे असलेले समोरच्याला आवडेल तसे वागायला सुरुवात होते.. कुठे तरी स्वतःला हरवत जातोय आपण याची जाणीवच होत नाही.. नुसता मनाचा गोंधळ सुरू होतो मग.. कुठलाही निर्णय नकोच की घ्यायला असे काहीसे वाटू लागते..

माझी ना एक मैत्रिण आहे.. खूप हुशार अगदी ब्रिलियंट कॅटॅगरीत बसणारी.. नुकतेच तिचे लग्न झाले.. मी तिच्या घरी गेलेले एकदा.. तर मला विश्वास बसेना असं तिचं काहिसं वागणं..अतिशय बावळट भाव चेहर्‍यावर आणि भिरभिरी नजर.. सहज तिला म्हटले अग काय ग अशी का तू.. त्यावरचे तिचे उत्तर खरचं मला अचंबित करून गेले.. “अगं उगाच मी फार हुशार आहे हे कशाला दाखवा..त्यांना नाही आवडत आपलं सामान्य असलेलचं बरं .. ”

ही मुलगी तिचे सगळे व्यक्तिमत्त्व बदलायला निघाली होती…. का करतो आपण असे.. मान्य की समोरच्याला छान वाटेल असे वागावे.. अगदी मान्य… पण म्हणून स्वतःतील स्वतःला संपवून??? स्वतःची ओळख आपण स्वतःपासूनच हिरावून घेतोय आपण.. मग आपण होतो तरी कसे हेच कळेनासे होते..

असं कधी होतं का हो तुमचं?? कधी कधी ना आरश्यासमोर उभे राहून स्वतःकडेच टक लवून पहाताना एकदम अनोळखी वाटायला लागते.. एखाद्या गर्तेत असल्यासारखे.. काही तरी शोधतायत आपले डोळे असे वाटायला लागते.. पण काय तेच कळतं नाही.. काही तरी हवे असते पण आपल्याला काय हवे आहे हेच कळतं नाही.. काही तरी शोधत असतो.. काय ते माहित नाही .. कशासाठी ते ही माहित नाही.. कसलीशी जळमटं जाणवतात मनावर.. मळभ आल्यासारखे वाटते एकूणच रोजच्या जगण्यावर.. खरं तरं.. सगळं चांगलं तर चाललेल असतं.. शिक्षण,नोकरी,संसार..सगळं सगळं लौकिकार्थाने उत्तम तरीही कसलासा शोध घेत असते मन.. शुन्यातच..

पण या शुन्यातूनच सापडेल काही तरी नक्की हा दुर्दम्य आशावाद पाहिजे मनात.. मग कदाचित या चाचपडणार्‍या मनाला हाती काही तरी लागेल.. पण त्यासाठी आधी आपल्याला काहीतरी शोधायचे आहे हे तरी जाणवले पाहिजे.. मग हे काहीतरी म्हणजे काय हे हळूहळू ध्यानी येईलही आपल्या.. आणि एकदा ते काहीतरी आहे तरी काय हे कळले की सारा रस्ताच मोकळा होईल की हो..मग फ़क्त प्रयत्न अथक प्रयत्न.. ते साध्य करण्याचे..

 

टॅग्स:

सखा..


आज पुन्हा तो आला.. अगदी अवचित काहीही न कळवता..आवेगाने.. अगदी नेहमीप्रमाणे..

तो नेहमीच  असा येतो.. एखाद्या झंझावत्या वार्‍यासारखा आणि मी.. मी मग त्याच्या त्या ओघात अलगद पीसाप्रमाणे वहावत जाते.. तो कायम असचं करतो अगदी कायम ..

कितीदा मी ठरवते.. नाही म्हणजे नाहीच ऐकायचे त्याचं

अगदी बघायचंसुद्धा नाही त्याच्याकडे..

दार घट्ट बंद करून घराच्या उबेत मिटून घ्यायचं स्वतःला..

अगदी कानावर हात ठेवून त्याचा तो मनोहारी गाज रुजूच द्यायचाच नाही मनात…

पण, या असल्या छोट्या छोट्या उपायांनी तो थोडाच मागे फिरणारे..

चांगलाच हट्टी आहे तो आणि हुशारही..

कधी खिडकीतून वाकूल्या दाखवेल..

कधी माझ्या इटुकल्या जाई-जुईंनाच फितूर करेल आणि स्वतःच्या सुगंधाने त्यांनाही गंधीत करेल..

आणि मग हळूच म्हणेल, “अगं जवळपास वर्षाने येतोय मी.. मी नसताना तर माझी आठवण काढतेस.. अगदी डोळ्यात मीच उभा राहीतो झुरत रहातेस..

माझी स्वप्न पण रंगवतेस आणि आज मी आलोय तर हे काय ग नवे… नको ना अशी हिरमसून जाऊ…”

त्याचे ते कृष्णसख्यासारखं रुपडं आणि ते गंधित हास्य मगं हलकेच मला कसे काय मोहवते नेहमी कळतच नाही मला ..

तरीही आज मात्र मी अगदी ठाम.. “आज नाहीच यायचं याच्या लोभस बोलण्यात आज..

खरं तर चांगला आहे तो मनाने..कसा आहे तो ते कदाचित शब्दात नाही येणार बांधता मला..

कारण तो दर वेळी वेगळा आहे.. कधी हळूवार, कधी झेपणार नाही इतका वेगवान..

अगदी जवळ असून कुठल्यातरी दुरत्वाशी नातं टिकवून असलेला..

या क्षणाला अगदी माझा सखा म्हणावा असा पण क्षणार्धात ……..क्षणार्धात  कुठं कोणासं ठाऊक ..

म्हणूनच.. नाही आज नाहीच बोलायची मी त्याच्याशी.. अगदी अगदी वाईट्ट आहे तो.. हेच खरं…

आधी असं अचानक यायचं, भुलवायचं आणि मग नकळत अलवार निघून जायचं

आणि मागे मात्र शिल्लक ठेवायची ती एक जाणीव ..

खास त्याची अशी सगळीकडे भरून ठेवायचं स्वतःचं अस्तित्व त्याचं अन त्याच्या गंधाचं..

आणि मग.. पुन्हा विरह..पुन्हा ते तळमळून वाट पहाणे..

आणि तो ???  तो मात्र येणार त्याला हवे तेव्हा..हवा तसा..

पण.. आज नाही .. नाही म्हणजे मुळीचच नाही..”

पण..पण मनाच्या या सगळ्या खेळात आजही माझ्या लक्षातच आले नाही , माझं ते गॅलरीतून अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे पहात रहाणे..समोरचं चित्र आता धूसर धूसर..डोळे भरून आलेले माझे आणि त्याचेही.. म्हणूनच की काय.. त्याचे ते आर्जव अधिकच तीव्र..

मी नेटाने त्याच्याकडे पाठ फिरवून आले खरी घरात पुन्हा.पण आता मन काही मानेना..मनाला आडवायचे सगळे प्रयत्न केविलवाणे ठरलेले..

जाऊ दे.. नको मन मोडायला त्याचे आणि माझे ही.. अखेर माझी सपशेल माघार..

आणि मग मात्र.. बेबंध, बेधूंद मी धावत आले अंगणात..                        

तो अजूनही कोसळतच होता. त्याच्या गंधाने सगळ्यांच वेडं करतचं होता..आता मी कोसळू दिलं त्याच्या त्या सरींना माझ्यावर..रोमारोमात भिनू दिलं मी त्याला..

आणि हलकेच त्याच्या कानात लटक्या रागाने आकंठ भिजत म्हटले..

” का रे करतोस असा नेहमी नेहमी..आज अगदी ठरवले होते मी नाहीच भिजायचे असे.. नाहीच असे ऐकायचे असे तुझे..

नकोच तुझा तो गंध आणि ती वेडी सर.. पण तू ही दुष्ट आहेस अगदी..बरोबर मला हळवे करतोस..

का रे तुझ्या येण्याने वेड लागते.. इतकी मोठी झाले तरी तू आलास की का पुन्हा लहान व्हावे वाटते..

पण तू मात्र तुला हवा तेव्हा येतोस आणि मला ही अशी बावरी करून टाकतोस ..

पण तू तुझ्या मर्जीचा मालक..हवा तेव्हा येणारा.. जा..

आज जाऊ दे पण उद्यापासून  अगदी कट्टी आहे रे मी तुझ्याशी.. जाम बट्टी नाही हं घेणार.. अगदी कट्टी म्हणजे पक्की कट्टी..  ”

 

असं होतं का हो कधी तुमचं ???


असं होतं का हो कधी तुमचं?? एक अनामिक अस्वस्थतेची लहर नव्हे नव्हे लाटचं येते उभ्या जगण्यावरखरं तरं खूप छान चाललेलं असतं सगळं..

चांगली (की गलेलठ्ठ म्हणू) नोकरी, उत्तम घर, कदाचित गाडी इत्यादी इत्यादी यापेक्षा सुंदर काय असणार असं सगळ्यांना वाटतं असतं तरीही एखादं मन मात्र

अस्वस्थ असतं या सर्वात असुनंही काही तरी शोधतं असतं एक प्रकारची अस्वस्थता असते..शिथिलता..पण ही येतेय का आणि कुठुन याचा काही शोध लागता लागतं नाही….

माझं ही असचं झालयं असं थोडसंम्हणुन म्हटलं जरा तुम्हालाही विचारुया तुमचं ही होतं का हो असं???

कदाचित रोजचा दिवस अगदी कालच्या सारखाच उगवतोयं याची खंत सतावतेय..नवीन अनुभव, नवीन आव्हानं हवीयतं ती सापडतं नाहियेत..

पण, खरं सांगू..या सगळ्यातून मरगळ आली असेल कदाचित पण निराशा नक्कीच नाही..

कारण, कुठे तरी जाणवतयं की या अस्वस्थतेतूनच एक नवा ध्यास सपडणार आहे..जोवर ही अस्वस्थता आहे ना..तोवर त्यातून बाहेर पडण्याची जिद्द काम करणारच..

खरी भिती असते ती निश्क्रिय मनाची..त्यापेक्षा ही अस्वस्थता किती तरी चांगली

यातूनच मग एक नवा सूर सापडेलं..एखादी सुंदर तान आख्खं जगणंच एक मैफ़िल करून टाकेल..

ज्याची त्याची ही तान भिन्न .. कुणाचि गप्पांच्या फ़डात, कुणाचि पहाटेच्या दवबिंदूना झेलतं फ़िरण्यातं, कुणाचि पुस्तकातल्या मौक्तिकात आणि कुणाचि टापटीप घरातं..

ती शोधायला हवी असं वाटणंच तिच्या पर्यंत पोचण्याचं पहिलं पाऊलं नव्हे काय??

जर स्वप्नं पाहिलचं नाही तरं ते पूर्ण करायची आसं कशी काय लागणार ? आणि आसचं नाही लागली तर ते स्वप्न ध्यास बनून प्रत्यक्षात उतरणार तरी कसे?

म्हणून ना, खूप खूप स्वप्न बघावित,उराशी बाळगावी आणि ध्यास घेऊन सत्यात ही उतरवावित

पण, मला ना जरा जास्तचं स्वप्न पडतात.. आणि त्यातल्या कुणाचा ध्यास घ्यायचा तेच कळेनासे होते कधी कधी..

म्हणजे ना.. कधी कधी (किंवा रोजचं म्हणा ना) खूप खूप वाचवे..नवं नवं लिहावं काहितरी, अगदी मनाच्या स्पंदनांइतकं नितळं आणि प्रामाणिक..

कधी वाटतं, रंगांच्या दुनियेत चित्रांना नव्याने समजून घ्यावे..

घराचे घरपणं मनसोक्त अनुभवावे..

नवीन नवीन (अर्थात चविष्ट आणि रुचकर) पदार्थ करावेत आणि खाऊ घलावेत..

बाग फुलवावीइत्यादी इत्यादी ….

अरे बापरे.. फ़ार जास्त पर्याय झाले ना..

कदाचित सगळे नाही जमणार एकावेळी.. पण यातला एखादा पर्याय बनून ही जाईल माझी तान..

पण त्याचा शोध मात्र घेतला पाहिजे मला, अगदी मनापसून.. सगळा आळस, शिथिलता झटकून.. आणि अगदी या क्षणापासून……

 

Success comes in CAN; failure in CAN’T


What do we think about when we hear the word success? Big cars, bigger homes, good ratings, promotions?

Success is much more than those things. Success is simply a thought we have.

Success is merely a thought. We just have to re-define how we see success and we will see that it is achievable.

Success is being able to do what one has set out to do; no matter how small or supposedly insignificant, in the eyes of others; is success in its essence. Success means doing the best we can with what we have.

Success is the doing, not the getting; in the trying, not the triumph.

Success is a personal standard, reaching for the highest that is in us, becoming all that we can be…. How to achieve it?

Tell me, how many times did we wake up not knowing what to do for the rest of the day? Make the break, its time to change…. So what are we waiting for? Don’t wait until everything is just right. It will never be perfect. There will always be challenges, obstacles and less than perfect conditions. So what. We have to start now. With each step we take, we will grow stronger and stronger, more and more skilled, more and more self-confident and more and more successful.

So the first step is Think On Paper. Most important, is what our definition of success is? What do we want and not what our parents or society? It is really up to an individual to fix own definition of success. In fact, it is imperative that we do so to give ourselves the right direction in life. Once we have decided what it is that we really want in life, we would not be bothered by what others think of us.

It is extremely liberating experience – we become free from others’ yardstick. We have to focus on our goals.

If scaling Mount Everest is what we deem as success, then who cares about that promotion at work. Of course having a successful career could also be one of our ideas of success.

We just have to prioritize and decide what is at the top of our list. Only then can we work out how much effort and time we would like to devote to each of our endeavor. When we do what we truly enjoy, we would naturally be happy. Yes, being happy is one of success’s criteria, albeit the most underrated one. And for some people, just living a happy life is success itself.

Once we have that figure work backwards and determine HOW you’re going to get to that figure. In other words, what do we have to do TODAY to make your goal for that month? Plan Your Day Ahead.

Stop yourself and realize that it’s only success and its partners “responsibility” and “change” that you’re really afraid of. Once we know our enemies then you can overcome them with ease. So, what can you do to reach that goal, starting today? At least have a goal and aim for it Wasting time is the excuse of unsuccessful people. Making important things happen is the attitude of people clothed with success If you don’t have goals, dreams or aspirations, then how are you going to achieve anything? Having something to aim for in life or business is the first step to being successful. e.g if you never plan to paint that kitchen, then that kitchen just won’t ever get painted.

Success breeds success, apathy only breeds more apathetic people sitting on the fence. Eat The Biggest & Ugliest Frogs FIRST – Try Try and just don’t give up. Persisting is not difficult when you start something. It’s not difficult when things are going fine. In fact, that’s not really persisting. The word ‘to persist’ becomes relevant only when the situation you’re in has become difficult and a part of you (or the complete you) wants to give up. At that moment, at that moment only, you take a critical decision: to go on or to give up. Don’t delay and develop a sense of urgency –

Success means having the courage to stick to one’s conviction in the face of opposition or even ridicule. In fact, the hardest of all is to constantly reaffirm oneself of one’s belief – that our definition of success is the one that matters. Success is a positive habit. Start doing what you need to do today and every day and pretty soon it becomes a POSITIVE HABIT. You will get better and more efficient at what you do and more successful as you develop better work habits. Success is triumphing over countless “failures” (I prefer to call them setbacks.) and not giving up.

Success is a great motivator no matter how small those successes are. As every success acts as a building block, a catalyst, so that once your goal is reached, you set another higher goal and now channel your energies and efforts towards that new goal. Many fail completely by setting unattainable goals or goals beyond their reach at that precise moment in time. By setting smaller more achievable goals you grow forward with more confidence. No one tries to climb a ladder by making the first step half way up do they, no; one rung at a time, and soon your ultimate goal will be reached with ease.

“Midas Touch” tells about a story of a legendary king given by a god with the power to transform whatever he laid hand into gold. It almost ended tragically by accidentally turning his daughter into gold. Living with success is an art of discipline and determination. It’s not failure we’re afraid of, it’s actually success.” Most people simply failed to grasp the fuller implications, of what they could actually achieve for themselves, simply by having a desire to be successful.

Success is not the key to happiness. Happiness is the key to success. If you love what you are doing, you will be successful

“Take up one idea. Make that one idea your life – think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves, every part of your body, be full of that idea, and just leave every other idea alone. This is the real way to success….

 

एक सकाळ अशीही…


एक सकाळ अशीही…
कधी कधी असं काहीसं होत ना की, आपल्याला आवडणाऱ्या या जागी, सगळ्याच गोष्टी अचानकच एकत्र येतात..
एखादा देखावा अगदी पूर्णत्वाला जावा तसे काहीसे.. अगदी योग्य ते चित्र, योग्य त्या जागी, हव्या त्या रंगात आपल्या समोर उभे राहावे तसे..
असेच काही झाले एका सकाळ ….

मी बस मधून माझ्या घरी कराडला चालले होते..
बघितले तर पुणे कराड प्रवास फक्त तीन – साडे तीन तासांचा..पण या एवढ्याश्या वेळात आयुष्यभर लक्षात राहावे असे क्षण दिले मला या प्रवासाने…
एक नवी दिशा दिली,
आयुष्यभर पुरेल अशी दृष्टी
आणि स्वतःशीच नवी ओळख दिली…

एक सुंदर सकाळ .. हवेत आलेला गारवा, हलकेच पडून गेलेला पाऊस…
त्या पावसात एक जादू होती..
हळुवारपणे पडणाऱ्या सरींनी  हलकेच मला हळवं  कसे काय केले उमगलेच  नाही मला….
साऱ्या वातावरणालाच सुगंधित करून टाकणाऱ्या मृदगंधाने गंधित केले माझे मन …
ते इवल्याश्या पानांवर पडणारे टपोरे थेंब आणि त्यांचा होणारा नाद मला माझ्यापासूनच भुलवू लागला होता..
सभोवताली पसरलेली हिरवीगार शेते , बागा सगळा निसर्गच जणू आज पावसाचे गाणे गात होता…
सुस्तावलेला रस्ताही आज पावसाला जणू वाट करून देत होता..
अशा सुंदर चित्रात मी गुंगून गेले होते , कदाचित हरवूनही  गेले होते….

आणि यावर कडी म्हणून की काय.. माझ्या हातात होते एक पुस्तक ….
पुस्तक  म्हणू  की पुस्तकापेक्षाही अगदी मन्मनात निनादात राहावे असे जीवनगाणे म्हणून त्याला..
” बेला फुले आधी रात ” शं. ना. नवरे यांची  ही अप्रतिम कलाकृती …
शं. ना म्हणत होते ….
“आता कुठे उजाडू लागलं आहे.. . ही श्रावणातली सकाळ माझ्याशी बोलू पाहत आहे..
अंगणातल्या प्राजक्ताची फुले आता पडू लागली आहेत..माझ्या  समोरच्या खिडकीतून त्यांचा सुगंध लाल-चुटूक पावलांनी आत येऊ पाहत आहे..
श्रावणातल्या पहाटेच्या कळीचे  सकाळच्या कळीत रुपांतर होऊ लागत तेव्हा गंधाची अशीच उधळण होते…रात्री चोरपावलांनी येऊन गेलेल्या पावसामुळे हवेत गारवा आहे,
बोचणारा आणि तरीही हवाहवासा वाटणारा ..
आज फार फार उत्साह वाटत आहे… मनात जे जे दाटले आहे ते ते सगळे रूप घेऊ पाहतेय…”

शब्दांची जादू काय अफाट असते पहा ना…. वाचता वाचताच वाटू लागले आपल्याही मनातले सगळे आज शब्द रूप  घेईल खरे…..
शब्द्नाच्या जाळ्यात येईल कदाचित पकडता हे सगळे सौंदर्य…
सौंदर्य… या सगळ्या निसर्गाचे… ह्या शब्दांचे…
वाटले, ह्या सौंदर्याशी बोलायला चार भिंतीच्या बाहेर पडले पाहिजे..
धुके पसरलेल्या रस्त्याने चलात राहिले पाहिजे, कुठल्याही लक्ष्याचा पाठलाग न करता ..निवांतपणे..त्याला समजून घेत…
पायाला स्पर्श झाला पाहिजे ओल्या मातीचा..
जाणवली पाहिजे ती बोचरी थंडी..
ती हिरवीगार हवा पांघरली पाहिजे अंगभर ..
साठवले पाहिजेत ते पक्षांचे निनाद..
अगदी अगदी स्वतःला विसरले पाहिजे….

त्या शब्दांनी जादू केली होती..
माझ्या मनाला आनंदाबरोबरच एक नवी दिशा मिळाली होती या सृष्टीच्या अफाट सौंदर्याकडे बघायची…
कुठे तरी आत खोलवर एक नवी जाणीव जन्म घेत होती, आणि मला सांगत होती, बघ तरी या सुंदर निसर्गाकडे, त्याच्या पूर्णत्वाकडे, आणि
ही किमया साधली होती शं. नां. च्या त्या शब्दांनी…
आज कळले मला.. दोन शक्तिस्थाने … निसर्ग आणि शब्द.. …

प्रवास हा इतका आनंददायी असू शकतो हे आज पहिल्यांदाच जाणवले मला..
शब्दांची ताकद अफाट असते आज पहिल्यांदाच अनुभवले मी…
त्या शब्दांनी, त्या सुंदर निसर्गाने काय केली किमया कळलेच नाही, कळलेच नाही कसा झाला प्रवासातला तो एकटेपणा दूर,
कशी मिळाली सोबत त्या शब्दांची, त्या निसर्गाने गायलेल्या सुरांची..
अशी सोबत की अगदी माझी मलाच जाणीव राहू नये आणि नकळत त्या सोबतीची मात्र मैफिल बनून जावी…..
मैफील शब्दांची ,
मैफील सुरांची,
मैफील त्या निसर्गात सामावणाऱ्या त्या प्रत्येकाची ज्यांनी हे क्षण अनुभवले
आणि अगदी त्यांच्याही नकळत मन्मनात रुजवले….

 

का ? कशासाठी? कुणासाठी ? आणि कधीपर्यंत ???


का ? कशासाठी? कुणासाठी आणि कधीपर्यंत ?????

एक होती चिऊ आणि एक होता काऊ
काऊचे घर होते शेणाचे आणि चिऊचे घर होते मेणाचे
एकदा काय झालं, खूप मोठा पाऊस आला , अगदी धो-धो पाऊस
बिचाऱ्या काऊचे घर गेले वाहून ,
काऊ मग घाबरला,  त्याला मग आठवण झाली चिऊची आणि तिच्या मेणाच्या घराची..
काऊ गेला चिऊकडे, म्हणाला “चिऊताई चिऊताई, दार उघड , माझं घर गेलं गं वाहून या धो-धो पावसात, मला येऊ दे ना तुझ्या घरात..”
चिऊताई म्हणाली ” थांब रे काऊ, माझ्या बाळाला मी आंघोळ घालते आहे  , मग उघडते दार ”
बराच वेळ झाला तरी चिऊताई काही दार उघडेना , मग काऊ पुन्हा म्हणाला “चिऊताई चिऊताई, दार उघड..”
“थांब रे काऊ जरा वेळ, मी माझ्या बाळाला तीट लावतेय ” चिऊताई म्हणाली
अजून थोड्या वेळाने काऊनी पुन्हा चिऊताईला आवाज दिला पण परत चिऊताई म्हणते कशी
“शू ……. नको ना रे आरडओरडा करू, मी माझ्या बाळाला झोपवतेय आणि मग उघडते दार ”

लहानपणापासून सगळ्यांनीच ऐकलेली, सांगितलेली गोष्ट ही चिऊ नि काऊची !!
त्या गोष्टीत जाणवणारी काऊची असहायत्ता आणि चिऊची तिच्या पिल्लाविषयीची आत्मियता !
पण आज अचानकच गोष्ट नव्याने ऐकताना नकळत नव्याने समजत गेली मला..
आणि मग मात्र वाटते तितकी छोटी राहिलीच नाही  ती !!

आज ही चिऊ धडपडतेच आहे तिच्या पिल्लांसाठी..त्यांच्या पंखात उत्तुंग भरारी मारण्याचे बळ यावे म्हणून ..
तिच्या नि त्याच्या संसाराला अधिक सुंदर करण्यासाठी
नवनव्या वाट शोधताना , घरासाठी , पिल्लांसाठी आणि अगदी स्वतःसाठीसुद्धा अखंड धावत असतात दोघेही तो आणि तीही !!

पण कधी मनात येते…
या धावपळीमध्ये ज्याच्यासाठी ही  सगळी पळापळ करायची त्या पिल्लांना येत का मनापासून शांतपणे भरवता, तीट लावता आणि अंगाई म्हणून निजवता?
डोळे भरून पाहण्याची तरी होते का मग सवड? त्याच्या किलबिलाटाला येतो का देता तितकाच उत्साही प्रतिसाद?
एखाद्या असहाय्य काऊला मदतीचा हात येते का देता त्याच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ,
कि आपली ही धावपळ इतका वेग घेते कि त्यात दिसतच नाही आपल्याला एखाद्या काऊचे घर वाहून जाताना?

खरंच, का हे धावणे ? कशासाठी? कुणासाठी? आणि कधीपर्यंत?
रंगीत आणि मोठ्या फुलांच्या शेजारी , शुभ्र आणि लहानगी फुले सुद्धा डोलाततच ना ?
सूर्यासारखे तेज नाही म्हणून काजवा प्रकाशायचा का थांबतो?
समुद्रासारखे फेसाळते पाणी नाही म्हणून नदी का वाहायची थांबते?
मग आपलाच का अट्टाहास स्पर्धेत सर्वात पुढे जाण्याचा? दर वेळी नव्याने स्वतःला सिद्ध करण्याचा ?
आणि या सगळ्या स्पर्धेत आपण आपल्यालाच हरवून बसतो हे का नाही येत लक्षात आपल्या?

आता तर आठवत ही नाही ना  , किती दिवस झाले..  ,
ब्रह्मकमळाच्या कळीचे फुल होताना पाहण्यासाठी रात्र  रात्र जागवून?
थंडगार संगमरवाराला हात लावून?
उंच उडी मारून घंटानाद करून?
पहिल्या पावसात वेडे  होऊन चिंब भिजून?
पावसात भिजलेल , थरथरणारे माऊचे पिल्लू हळुवारपणे घरात आणून?
आणि अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत खळखळून हसून सुद्धा?
मोठे झाल्याची लक्षण म्हणेल कुणी याला … पण मोठे होण्यासाठी मनातले मुलं आणि जीवन भरभरून जगण्याची वृत्तीच हरवून बसावी असे थोडीच आहे ?

पण, कुठे तरी आपल्याला थांबले पाहिजे , क्षणभराची विश्रांती म्हणून तरी ..
आणि ऐकायला हवी हाक आपल्याच मनाची ..
साद घालताच असते आपले मन आपल्याला , त्यालाही हवाच असतो आपला वेळ , त्याची विचारपूस करण्यासाठी , त्याला काय हवे-नको ऐकण्यासाठी
त्याच्या ही असतातच कि भावना.. नेहमीच ते आपले ऐकत असते बिचारे, ऐकू या कि त्याला ही काय म्हणायचंय..

या क्षणभर विसाव्यात विसावूयात आपल्याच आपल्यांबरोबर , आपल्या धकाधकीच्या जीवनातील काही दोन-चार क्षण तरी मिळावेत म्हणून धडपडणाऱ्या
आपल्या प्रत्येक आप्ताबरोबर !

पाहूया सभोवताली , आपल्यासारख्याच धावणाऱ्या एखाद्याला हवीय का आपली मदत ?
त्याच्या अडचणीमध्ये , त्याच्या प्रश्नांमध्ये, तर कधी त्याच्या सुखांमध्ये सामील होण्यासाठी  आणि कधी अगदी मूकपणे फक्त एक आश्वासक सोबत देण्यासाठी ..

कदाचित सापडतील ही मग आपल्याला  या “का, कशासाठी, कुणासाठी” अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या अवचित वळणावरती
आणि देऊन जातील आपल्याला नवीन उमेद नव्याने वाटचाल करण्यासाठी
क्षणभर  विश्रांतीच मग होऊन जाईल,  एका रम्य स्वप्नाच्या वास्तवात उतरण्याची सुरुवात !!!

 

|||| सखी ||||


|||| सखी ||||

एकदा मला माझ्याच जुन्या डायरीत सापडलं एक पिंपळाच पान !!
जाळीदार , सुबक आणि एक अनामिक सुगंध असणार…
सुगंध स्मृतींचा , सुरेल सुवास होता त्याला आठवणींचा ..
त्या जाळीदार पानाच्या हरेक नक्षीत होती एक आठवण ! कुपीत अत्तर जपावं तशी एक एक साठवण !!
आठवणी.., काही गोड आणि काही कडू  , काही हसऱ्या तर काही रुसव्याही  !!

अजून आठवतंय मला,
इवल्याश्या बिलोऱ्या बोलांनी एकत्र गायलेली गाणी,
चिमुकल्या डोळ्यांनी मिळून पाहिलेली मोठी, मोठी आणि रंगीत स्वप्ने,
डोलणाऱ्या शुभ्र निशिगांधला पाहून हरखणारी माझी सखी !!
इटुकल्या-मिटुकल्या  कैरीची फोड माझ्यासाठी घेऊन येणारी माझी जिवलग मैत्रीण !!
अगदी कट्टी नि बट्टीचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतानाही गट्टी मात्र कधी न सोडणारी !!

खरच इवल्याश्या वयात, मैत्रीचा तत्विकार्थाने अर्थ माहीत  नसूनही कशी जमते अशी प्रगाढ मैत्री? न सुटणार कोडंच नव्हे काय हे?
का वाढते ती एकत्र वाटून खाल्लेल्या डब्यातल्या प्रत्येक घासाबरोबर?
का होते अधिकच पक्की चोरून खाल्लेल्या चिंचेच्या आंबट-गोड बुटुकाबरोबर  ?
खिशातून जपून आणलेल्या चॉकलेटच्या दोन तुकड्यांची चव का बरे  वाढत जाते ते मिळून खाताना?
मैत्रीला पडतात का हो असे प्रश्न?

आजही सांगावीशी वाटतेच ना?  आवडलेली कविता , भावलेलं गाणं  सखीच्या कानात हळूच..
आठवावेसे वाटतातच ना  ते सारे क्षण?  ज्यांनी दिला मनाला एक अनमोल ठेवा..
पावसात भिजत तासनतास गाडीवरून भटकताना, टपरीवरची भाजी भिजत भिजत खाताना
छोट्याश्या विनोदावर डोळे भरून येईपर्यंत हसताना
लिहिलेली पहिली कविता हळूच तिला ऐकवताना
अगदी ऐन थंडीत थंडगार आईस्क्रीम फस्त करताना
अभ्यासाच्या नावाखाली गप्पांची मैफिल जमवताना
या सखीची किती रूपे साठत गेली मनात आणि नकळत तीच रुजत गेली माझ्यात !!

मनात खोलवर दडलेलं गुपित हलकेच उलगडतं या सखीसमोर..
इतकं सहज , इतकं अलगद ..
पाकळीवरच्या दवबिंदूसारखं , फुलाच्याही नकळत त्याने पाकळीला स्पर्शाव
तसं..
सहज जमत तिला माझ्याही नकळत अलगद,
माझ्याच गुपीताला आपलंस करून घेणं  ..
अन मग रात्र-रात्र जागवण , रचत स्वप्नांचे मनोरे , कधी तिच्या तर कधी माझ्या स्वप्नांचे
जणू ती वेगळी नसावीतच कधी…

किती रंग, किती गंध अन किती रूप या मैत्रीची !!
मनातले मनात राहूनही,  अव्यक्ताचे व्यक्त करू जाणणार्या   माझ्या या सखीची…….