RSS

मज्जाच मज्जा…. :)

23 सप्टेंबर

अगदी सर्वात पहिल्यांदा खूप खूप सॉरी… का काय?? किती दिवस गायब रहायचं माणसानी.. काही लिमिट??? आज लिहू.. उद्या लिहू.. शनिवारी नक्की.. नाहीतर गेला बाजार रविवारी तर अगदी पक्कं.. किती वायदे स्वतःशीच आणि तुमच्याशी सुद्धा.. पण छे.. कधी लिहायला बसावं आणि विषयचं सुचू नये.. कधी विषय सुचावा पण लिहायला सवडच मिळू नये.. आणि आता आहे बुवा सवड चला लिहून पूर्ण करू आज म्हणावं तर तर तो विषय कधीचाच हातातून निसटून गेलेला.. एकूणच सारे विषय माझ्याशी कट्टी फू केल्यासारखे वागायला लागले.. पण मला काही फू तर फू असं म्हणता येईना.. रुसलेल्या मैत्रिणीसारखी समजूत काढावी लागली मला… खरचं हे समजूत काढणे काय अजब रसायन असायचं नाही लहानपणी?? तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.. घटकेत कट्टी घटकेत बट्टी.. आज हा खेळ तर उद्या तो..पण हे कट्टी नि बट्टी सगळीकडे अव्याहत चालूच..

काय खेळ तरी..मला आठवतयं.. माझ्या एक मैत्रिणीच्या घरात तळघर होतं आणि तिथं होता एक झोपाळा.. रोज संध्याकाळी तिथे जमल्यावर खेळ काय असायचा माहितेय?.. आमच्यातल्या काही जणी व्हायच्या मासोळ्या आणि बाकीच्या मासेमार.. मग मासोळ्या त्या झोपाळ्याखालून सरपटत जायच्या आणि झोपाळ्यावर बसलेले मासेमार त्यांना गळ लावून पकडणार.. अधेमधे मासेमार आणि मासोळ्या यांच्यात समझोता होवून रोल बदलायचे.. पण खेळ तोच.. आणि परिणाम.. सगळ्या बिचार्‍या मासोळ्यांना एका नव्हे दोन दोनदा क्षिक्षेला सामोरे जावे लागायचे.. एकदा मासेमारांच्या गळाला अडकून आणि घरी जाताच.. मळकट्ट्ट्ट कपडे पाहून मातोश्रींच्या….तरीही हा खेळ अव्याहतपणे चालू राहिला..

आणि माझी तर मज्जा अशी होती की वर्षभर मी अगदी शहाण्या (खरचं अगदी खेळलेल्या सगळ्या खेळांशपथ्थ.. (थ.. त नाही, त वाली शपत खोटी असते म्हणतात..) खरचं) मुलीसारखी ६ ते ७ खेळून परत यायचे.. हात बित धूवून शुभंकरोती सुद्धा म्हणायचे म्हणे.. पण…एकदा का परिक्षा जवळ आली की मग.. जो काही उत यायचा खेळण्याचा..काही केल्या घरी जायचे नाव काढायचे नाही मी.. मग आमच्या ताईबाई यायच्या निरोप घेवून..”बोलावलयं” बास एक शब्दच पुरेसा असायचा..मग काय घरी गेलं की शितयुद्ध सुरु ताईबरोबर.. मी येणारच होते..लगेच बोलवायला कशाला आली तु…

ताईवरून आठवलं ताई आणि मी आणि एक गंमतशीर खेळ खेळायचो त्याचं नाव काय माहितेय.. “व्हिनस व्हिनस” अहो.. विल्यमांची व्हिनस.. आणि खेळ काय माहितेय.. तर आपण लिहायला तगड (हा हा .. किती दिवसांनी वापरला शब्द.. ) घेतो ना ते आणि प्लस्टिकचा बॉल घेवून व्हरांड्यातल्या भिंतीवर टेनिस खेळायचो..जिचा बॉल आधी खाली पडला ती हरली..मुलांचं कसं गल्ली क्रिकेट तसं आमचं हे व्हरांडा टेनिस.. या खेळामुळे फुटलेल्या गाडीच्या काचांमुळे पुढे पुढे हा खेळ मागे पडला नाहितर.. आज दोन लेडी फेडरर (जरी खेळाचं नाव व्हिनस असलं तरी आता मला फेडरर आवडतो ना म्हणून..) निर्माण झाल्या असत्या… असो..

बाकी मग लगोरी नव्हे नव्हे लग्ग्गोरी… असं जोरात किंचाळत पळायचा खेळ तर आमचा जामच लाडका होता.. लपाछपीला तर कधी इतक्या सरळ नावाने हाक मारलीच नाही.. डबा ऐस्पैस …… असं काहीसं म्हणायचो यातल्या ऐस्पैसचा अर्थ काय हे अजून आमच्या शुद्रमतीला समजले नाही.. असाच एक शब्द .. ‍टॅम्प्लिस.. याचा खरा उच्चार टाईम प्लिज आहे हे तो शब्द वापरायचे थांबले आणि मग समजले.. तो पर्यंत..हातची उलटी मुठ तोंडापाशी नेत ‍टॅम्प्लिस म्हणणे हे सर्व संकटातू बाहेर पडायचे साधन एवढेच ठावूक होते..

असाचं एक प्रिय खेळ म्हणजे काचापाणी.. मी तिसरीमध्ये माझ्या आजीकडे होते शिकायला कल्याणला.. केवढा तरी वाडा होता तो..त्यात ना एक कासारआजी रहायच्या त्यांच्याकडून फुटक्या काचा आणायच्या अगदी पिशवीभरून आणि मग त्या सगळ्या काचा पाटावर खळ्ळकन ओतायच्या.. असा काही सुरेख दिसायचा पाट..रंगबिरंगी काचांनी सजलेला.. आणि मग अगदी हलक्या हातांनी एक एक काच उचलायची, ती उचलताना जर का दुसरी काच हलली तर जोरात किंचाळायचे “आऊट….” मग त्या आपण जमवलेल्या काचा ही संपत्ती.. या काचांचे आदान-प्रदान सुद्धा व्हायचे.. म्हणजे त्या मखमली हिरव्या काचेच्या बदल्यात ती निळीशार दे वगैरे वगैरे… अगदी कधे मधे एखादी काच हातात घुसायची बिसायची सुद्धा पण एक किरकोळ भोकाड पसरून सहानुभुती मिळताच नव्याने डाव सुरु…

रडीचा असो वा पडीचा हे सगळे खेळ खेळण्यात काय धमाल यायची.. मे महिन्याची सुट्टी म्हणजे तर धमाल करण्याची परिसीमा.. उच्छाद आणणे हा वाक्प्रचार मी तेव्हा शिकले नव्हे नव्हे जगले.. इतका दंगा की आता आठवलं तरी हसू येतयं.. आमच्या या दंग्याला वैतागून आईने एकदा आम्हाला जरा शांतपणे उद्योगाला लावण्यासाठी एक कल्पना काढली.. एवढी ढिगाने पुस्तक आहेत.. एक मस्त लायब्ररी काढा बघू दोघी मिळून.. झालं कल्पना तर झकास होती आणि तिच्यामते अतिशय सेफ.. पण आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर त्या वाचनालयाचं नावं काय ठेवायचं यावरून पार मारामारी केली.. मग सर्वानुमते (खरतरं या सर्वांमधे फक्त आईच होती कारण आम्हा दोघीत समझोता घडवणं तिलाच शक्य होतं..) नाव ठरलं.. “चैतन्य वाचनालय”.. आता गाडी पुढं अडली ती पुस्तकांना कव्हर घालण्यासाठी.. जवळजवळ १०० तरी पुस्तकं असतील मग एवढ्यांना कव्हर घालायचे म्हणजे कागद लागणारच की.. पुस्तकं फाटू नये या अतिशय निर्मळ हेतूने सुरू झालेल्या या कामामुळे आक्खी खोली कागदाचे कपटे..थोडा फार डिंक आणि पुस्तकांना नंबर घालायला चुक्कून (खरचं ..शप्पथ,.. चुक्कून) कापलेलं त्याच वर्षाचे कॅलेंडर.. अशा सगळ्या वस्तूंनी भरून गेली.. आणि भरपूर ओरडा खाऊन का होईना सुरू झालेलं आमचं हे वाचनालय बर्‍याच अडचणींवर (एकदा नेलेलं पुस्तक परत न मिळणे, आता देऊनच टाक की ग मला हे पुस्तक अशा मागण्यांना बळी पडणे..वगैरे वगैरे) मात करत महिनाभर चालले.. आणि मग आम्हीच सुट्टीसाठी गावाला गेल्याने बंद्च पडले.. पण ती आमची पहिली खरी कमाई होती.. आक्खी दुपार कोणीतरी येईल पुस्तक घ्यायला म्हणून व्हरांड्यात (तोच तोच व्हरांडा) बसून काढली आम्ही..

पण मजा यायची नाही लहानपणी.. थोडा फार अभ्यास केला की आई बाबा खूश मग हवं तेवढं खेळा.. मुद्दाम कुठल्या संस्कार शिबिराला , उन्हाळी शिबिराला जावे लागले नाही. सगळे संस्कार, सगळे अ‍ॅडव्हेंचर मैत्रिणींबरोबर खेळताना, आई-बाबांबरोबर धमाल करताना आपोआप मिळत गेले.. सगळं एकमेकांबरोबर वाटून घ्यावं , मनातलं बोलून मोकळं व्हाव या साठी कधी बाहेर जवून कुठला कोर्स नाही करावा लागला..घरी ताईबरोबर आपोआपच हे रुजत गेलं.. आता वाटतं केवढं सुंदर आणि परिपूर्ण बालपण गेलं आपलं.. शाळा चालू असताना भरपूर अभ्यास करावा.. स्पर्धांमध्ये भाग घ्यावा अर्थात आवडतील त्या सक्ती कधीच नव्हती..पोटभर दंगा करावा.. मैत्रिणीशी भांडावं, रुसावं आणि मग आईच्या कुशीत शिरून हळूच चुक कबूल करून मोकळं व्हावं.. कसलीच कृत्रिमता नव्हती ना कश्शातच..

बापरे.. माझी गाडी एकदमच भुतकाळाच्या स्टेशनवर अडकलीय की हो.. आज हे सगळे खेळ फेर धरून नाचताहेत असं वाटतयं..कोण कोण आहे महितेय.. विषामृत, संकटसाखळी, मुंबई-दिल्ली-कलकत्ता, राजा राणीचा बेपत्ता.. नावच केवढं मोठं..पण खेळ जाम मजेशीर .. एकावर डाव तो लांब उभा रहाणार बाकीच्यांकडे पाठ करून आणि म्हणणार..”मुंबई-दिल्ली-कलकत्ता, राजा राणीचा बेपत्ता” टाळी वाजवत हं (का माहित नाही..) बाकीचे मग पळत त्याच्या दिशेने सुटायचे.. त्याला जोरात धपका मारण्यासाठी पण मधेच त्या डाव घेण्यार्‍याने जर मागे वळून पाहिलं तर स्तब्ध.. सगळे जसे आहेत तसे.. आणि मग पार्ट टू.. त्या सगळ्याना हसवायचं त्या डाव असलेल्याने.. जो हसेल तो आऊट.. काय धमाल यायची..

अशीच धम्माल केली अ‍ॅडमिट किडा खेळताना.. डाव घेणारा एखादे घर किंवा गाडी सांगणार आणि बाकी सगळ्यांनी त्याला जावून शिवून यायचे.. अर्थात जाता येता फक्त लोखंडी वस्तूंना धरत.. नाहीतर आऊट.. असचं ना एकदा आम्ही टिपिटिपि टिप्टॉप खेळत होतो डाव होता माझ्यावर किती रंग सांगून झाले पण कुणी आऊटच होईना.. मी पारचं वैतागले.. शेवटी मला ना एक आकाशकंदिल दिसला.. ठिपक्या ठिपक्यांचा.. मग काय मी तात्काळ रंग सांगितला.. “ठिपकेरी… ” कोणाला कळायच्या आत एकाला आऊट पण केलं पण कसल्ला कल्ला केला सगळ्यांनी..

केवढा फेर फटका मारला आज ना.. एका वेगळ्याच दुनियेत असल्यासारखं वाटतयं.. अजून किती तरी खेळ खुणावतायत.. नाव गाव फळ फुल.. लंगडी पळती.. डॉंकी-मंकी..गजगे..झिपकोळी..एवढे सारे खेळ खेळायचो ..आठवून पण किती छान वाटतयं ना..एकदम ताजेतवाने झाल्यासारखे..मोकळा श्वास घेतल्यासारखे.. स्वच्छंदी..मुक्त…. खरचं काही न बोलता, आव न आणता सुद्धा या खेळांनी किती समृद्ध केलं बालपण.. सगळ्यांचच..त्या सगळ्या खेळांना , माझ्या सवंगड्याना.. त्या सगळ्या जागांना खूप खूप थॅंक्यू.. अगदी मनापासून….

 

ता.क.: आणि एक थॅक्यू आहे बरका.. माझ्या एका मैत्रिणीला.. हा विषय सुचवण्यासाठी.. थॅंक्स रश्मी…

आणि हो.. मला माझा हा खेळण्यांचा पेटारा उघडायला फार फार मज्जा आली… पण तुमचेही नवे-जुने खेळ ऐकायला मिळाले तर मग काय मज्जाच मज्जा…. 🙂

 
19 प्रतिक्रिया

Posted by on सप्टेंबर 23, 2011 in गंमत-जंमत

 

19 responses to “मज्जाच मज्जा…. :)

  1. rushikesh sane

    सप्टेंबर 23, 2011 at 4:34 सकाळी

    Dhammal lekh ahe ! Ekdam maja ali vachatana. Vachatana agadi lahan zalyasarakha vatala ani nakalat lahanapanicha niragas hasu suddha umatala cheharyavar 🙂 By the way mala sagalyat nav avadata te ‘Admit kida..’ ya khelacha. Bagh na khel ani nav yaat kahi suddha samya nahiye. Kon kida kuthala kida ani kunacha ghar….pan majjach majja yete he matr kharach !!!

     
    • Madhura Sane

      सप्टेंबर 23, 2011 at 4:41 सकाळी

      खरच..Admit किडा का नाव होत कधी कळलाच नाही.. पण मजा यायची आणि लोखंड म्हणून काय वाटेल ते पकडायचे आणि मग हे लोखंडाच कसे आहे यावर हुज्जत घालत बसायचे..
      पण ही हुज्जत नव्या खेळाबरोबर विरून जायची फार फार निर्मळ मानाने चालायचे सगळे.. 🙂

       
  2. Rashmi

    सप्टेंबर 23, 2011 at 4:39 सकाळी

    Sahech ga madhura…Kasala bhari lehela ahes…Vachatana full old memories recollect zalya…Ekdam tya vayat parat javasa vatala…far bhari..UTAKRUSHTHA>…:D 😀

     
    • Madhura Sane

      सप्टेंबर 23, 2011 at 4:45 सकाळी

      🙂 🙂 .. रश्मी.. आग धन्यवाद तर तुला.. तुझ्यामुळेच हा विषय सुचला आणि इतके खेळ आठवत गेले कि.. अजून दोन-चार पान भरतायत के काय असा वाटलं बघ.. 🙂

       
  3. Ganesh S Divekar

    सप्टेंबर 23, 2011 at 4:41 सकाळी

    awesome!! awesome!!! awesome!!! loved the way you write about yourself and your posts are really good… today when i tried marathi wordpress i found your blog and was surprised!!!!!!
    Really nice and Thanks alot!!!!!MARATHI ROCKS

     
    • Madhura Sane

      सप्टेंबर 23, 2011 at 4:43 सकाळी

      खूप खूप धन्यवाद गणेश.. ब्लॉगवर स्वागत.. मराठीची जादू काही औरच आहे हे खर 🙂

       
  4. suvarna

    सप्टेंबर 23, 2011 at 6:34 सकाळी

    मधुरा बाई काय ग राणी कुठे होतीस खूप दिवस . किती दिवस तुझी चातकासारखी वाट पाहायला लावतेस पण तुझा ब्लोक वाचला खूप सुंदर आणि अप्रतिम एकदम लहान पानात घेऊन गेलीस मी गावाला जाते तेव्हा ज्या जागेंवर आम्ही खेळलो ती खूप निरखून पाहते आणि तासभर तिथे जाऊन बसते . जागा पूर्ण बदल्यात तिथी नवीन निर्मिती झाली पण आठवणी तशाच ताज्या आहेत आणि तू परत ताज्या केल्यास आभारी आहे

     
    • Madhura Sane

      सप्टेंबर 23, 2011 at 6:48 सकाळी

      धन्यवाद ग सुवर्णा .. अडकले होते संसारात… कितीदा घाट घातला लिहायचा आणि कितीदा राहून गेले.. आता खरच लिहीन नियमित..
      छान वाटल तुझी कॉमेंट पाहून खूप खूप आभार..

       
  5. prashant redkar

    सप्टेंबर 23, 2011 at 8:43 सकाळी

    छान लिहिले आहे.
    माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

     
    • Madhura Sane

      सप्टेंबर 23, 2011 at 11:41 सकाळी

      धन्यवाद प्रशांत 🙂

       
  6. sarla

    सप्टेंबर 23, 2011 at 11:33 सकाळी

    vachatana lahanpan athaval.mast lekh.

     
    • Madhura Sane

      सप्टेंबर 23, 2011 at 11:40 सकाळी

      धन्यवाद सरला.. ब्लॉग वर मनःपूर्वक स्वागत 🙂

       
  7. Nitin

    सप्टेंबर 24, 2011 at 6:57 सकाळी

    मधुरा,
    खूप दिवसांनी तुमच्याच blog वर स्वागत. अतिशय सुंदर लेख ! What is important is प्रत्येक लेखा मध्ये ‘freshness’ is always maintained !
    Keep it up!
    नितीन

     
  8. Rahul Pardeshi

    सप्टेंबर 24, 2011 at 5:52 pm

    अ‍ॅडमिट किडा, विषामृत, संकटसाखळी, लग्ग्गोरी, डबा ऐस्पैस, लपाछपी, आबाधोबी ( ती सुद्धा कचकड्याच्या बॉलनी 😀 )…. किती भारी दिवस होते ते .. मला पण आठवलं सगळं…”तगड ” ऐकून कानाला खूप बरं वाटतंय…आपली कऱ्हाडी भाषा…Thank You Very Much for the Memories….

     
    • Madhura Sane

      ऑक्टोबर 1, 2011 at 4:21 सकाळी

      खरंय.. इतके नानाविध खेळ..पण मजा तेवढीच.. एकदम फुलापाखरी दिवस होते.. 🙂

       
  9. देवेंद्र चुरी

    सप्टेंबर 26, 2011 at 4:32 pm

    पुनरागमन जोरातच झालय, लहानपणीच्या अनेक आठवणी जागवणारा, नेहमीप्रमाणेच धमाल लेख ग ….. 🙂

     
    • Madhura Sane

      ऑक्टोबर 1, 2011 at 4:23 सकाळी

      खूप खूप धन्यवाद देवेंद्र.. आता सारखं-सारखं पुनरागमन नको..एवढीच इच्छा .. जरा नियमित लिहिण्याचे घडू दे माझ्याकडून.. 🙂

       
  10. writetopaint

    सप्टेंबर 29, 2011 at 10:35 सकाळी

    लहानपणी मी जिथे राहायचो, तिथे खेळायला जागा अशी नव्हतीच. त्यामुळे ह्या पैकी काही खेळ शाळेत खेळलेले आठवतात, जसं लगोरी.

     
    • Madhura Sane

      ऑक्टोबर 1, 2011 at 4:33 सकाळी

      धन्यवाद writetopaint .. ब्लॉगवर स्वागत.. या सगळ्या बालपणीच्या आठवणी सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतात ना.. 🙂

       

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: