RSS

Monthly Archives: ऑक्टोबर 2011

फॉरेस्ट गम्प.. – एक अनुभव !!


एक अतिशय नितांत सुंदर सिनेमा पाहिला मी गेल्या आठवड्यात.. आता नाव सांगितलं ना तर अत्यंत लेट करंट लेबल बसण्याची दाट शक्यता आहे..हा एवढा मोठा धोका असूनही, तो अनुभव कथन करावासा वाटतोय .. खरचं हा सिनेमा केवळ सिनेमा नाहीच आहे मुळी..तो एक अनुभव आहे.. हा सिनेमा आला १९९४ मध्ये.. तेव्हा आपली अवघी हिंदी सिनेसृष्टी हम आपके है कौन मय होती.. अर्थात मी पण.. आणि या अप्रतिम कलाकृतीकडे लक्ष जायला तब्बल १५१६ वर्ष जावी लागली.. तर आता नमनाला घडाभर तेल पुरेतर सिनेमा आहे फॉरेस्ट गम्प..

अरे काय भन्नाट चित्रपटटॉम हॅन्क्स हा अतिशय संवेदनशील आणि चतुरस्त्र अभिनेता आख्खा चित्रपट स्वतःच्या अभिनयच्या बळावर व्यापून टाकतो..

सुरुवात होते तीच इतकी मनाची पकड घेणारी.. आपला हा फॉरेस्ट गम्प वाट पाहतोय एका बसची.. आणि शेजारी बसचीच वाट बघत बसलेल्या एकीशी तो अचानक संभाषण सुरू करतो आणि विषय तर काय तर पायतले बूट.. दोन क्षण कळेनासे होते.. की हा नक्की काय बोलतोय

लगेच सीन दुसरा.. एक लहानगा मुलगा बसलाय एका बेंचवर बसचीच वाट बघत..

या मुलाकडे पहाताना सर्वात प्रथम लक्ष जाते ते त्याच्या पायांकडे.. कसल्याश्या लोखंडी आधाराने जखडलेले त्याचे पाय, आणि चेहर्‍यावरचे त्याचे निरागस भाव.. आणि वार्‍याबरोबर उडत येणारे एक पीस.. सगळा माहोलच आपण आता या फ़ॉरेस्ट गम्पच्या विश्वात रंगून जाणार आहोत अशी ग्वाही देत रहातो हा प्रसंग..

हळूहळू.. अगदी अलगद कथा उलगडत जाते.. पायाने अधू असणारा (खरं तर त्याच्या पाठीच्या मणक्यात काहीतरी दोष असतो ज्यामुळे.. तो नीट चालू शकत नसतो) हा फॉरेस्ट आणि त्याची आई दोघेच रहात असतात..ग्रीनबो , अलाबामामधे.. फॉरेस्ट फक्त पायानेच अधू नसतो तर त्याचा I.Q. सुद्धा सर्वसामान्यांपेक्षा कमी असतो..पण त्याची आई सतत त्याला सांगत रहाते..की तु वेगळा नाहीस..जे जे तुझ्या वयाचे तुझे मित्र करू शकतात ते सगळे तु सुद्धा करू शकतोस.. त्याच्या मनावर हे ती अगदी सोप्या भाषेत आणि निरतिशय प्रेमाने हे बिंबवत रहाते

मित्र म्हणावे तर असे कोणी नसतेच फ़ॉरेस्टला.. पण एक मैत्रिण मात्र मिळते.. स्वतःला जणू पक्षी होवून खूप खूप दूर उडून जाता यावं म्हणून प्रार्थना करणारी.. फ़ॉरेस्टला मनापासून साथ देणारी.. आणि त्याच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर अमुलाग्र बदल घडवून आणणारी जेनी..

या दोघा लहानग्यांना एकदा त्यांचेच काही मित्र त्रास देतात.. त्यांच्यापासून बचावासाठी फॉरेस्टला ती जोरात ओरडून सांगती रन फॉरेस्ट रन.. ” साधं नीट चालता न येणारा हा मुलगा.. आधी अडखळत, धडपडत..पळायला लागतो.. त्याच्या पायाची बंधन गळून पडतात.. जणू नवीन आयुष्य मिळत त्याला ..आता जिथं जायचं तिथं हा पठ्ठ्या पळतचं जायला लागतो.. वयाची ८१० वर्ष बंधनात घालवल्यावर मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आनंत अवर्णनीय असतो त्याच्या लेखी..

असेच वर्ष उलटतात.. केवळ त्याच्या अतिशय वेगाने धावण्याच्या या गुणामुळे.. त्याचं महविद्यालयीन शिक्षण अतिशय सुखकर होत.. पुढे हा सैन्यात जातो.. व्हिएतनाम युद्धात लढतो, आणि तिथे प्रवेश होतो त्याचं आयुष्य पुन्हा बदलून टाकण्यात महत्वाचा वाटा असणार्‍या दोघांचा..एक त्याचा कमांडिंग ऑफिसर डॅन आणि एक जवळचा मित्र बेंजामिन ब्लू.. उर्फ़.. बब्बा.. (bubba) .. हा त्याचा जिवश्चकन्ठश्च मित्र बनतो.. हा bubbaभलताच मजेशीर अवलिया असतो.. हा अहर्निश विचार करत असतो.. श्रिम्पचा..त्याला एक मोठी बोट बांधायची असते.. आणि आयुष्यभर श्रिम्प पकडत समुद्रकिनारी रहायचं असतं..फॉरेस्ट त्याला वचन देतो या युध्दानंतर मी तुला तुझी बोट बांधायला मदत करेन..

पण नशीबाला हे मान्य नसतं.. bubba.. युध्दात मृत्युमुखी पडतो.. आणि फॉरेस्ट त्याच्या वेगाने पळण्याच्या जोरावर पुन्हा एकदा.. स्वतः तर वाचतोच पण.. लेफ़्टनंट डेन सहीत त्याच्या अनेक सहकार्‍यांना वाचवतो..

युद्ध संपत..ठरल्याप्रमाणे हा श्रिम्पसाठी बोट बांधतो सुद्धा आणि बोटीचं नाव जेनी… , डेनच्या मदतीने यशस्वी सुद्धा होतो.. यशस्वी होवून घरी परततो.. दरम्यान त्याची आई वारते.. जेनी त्याला लग्नाला नकार देते.. हा अशाच मनाच्या एक अवस्थेत पळायला सुरुवात करतो , आणि पळतच रहातो.. थोडेथोडके दिवस नव्हे तर तब्बल तीन वर्ष आणि काही महिने.. त्याला अनेकजण साथ द्यायला धावू लागतात,,

मग अचानक तो थांबतो, घरी परततो.. जेनीला भेटतो, आणि तिच्या बरोबर असणार्‍या आपल्या मुलाला, तिच्याशी लग्न करतो, अतिशय अल्प सहवासात तिच्या आजारपणात तिला साथ देतो, तिच्या पश्चात अतिशय प्रेमाने मुलाला जपतो, तो आपल्यासारखा नसून अतिशय हुशार आहे या कल्पनेनेच हुरळून जातो

या एकाच माणासाच्या आयुष्यात किती घटना घडतात.. चित्रपट बघताना जाणवलचं होतं.. पण आज लिहिताना मी हा चित्रपट पुन्हा जगला.. किती नानारंगी रंगानी रंगलं होतं त्याचं आयुष्य..

केवळ मन लावून आणि श्रद्धेने काम करण्याच्या एका गुणामुळे.. कुठल्या कुठे पोचला फॉरेस्ट..बुद्धी नाही म्हणून हिणवला गेलेला फॉरेस्ट कुठे आणि हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत कल्पनेपलिकडे यश मिळवणारा फॉरेस्ट कुठे.. का आपण फक्त पुस्तकी बुद्धीला महत्व देत रहातो अजून ..फार फार प्रकर्षाने जाणवलं हे.. एक सच्चा मित्र, सच्चा प्रेमी, अतिशय प्रामणिक सहकारी, एक हळावा मुलगा, फार फार शूर, धाडसी फॉरेस्ट समोर आला या चित्रपटातून..

आता टॉम हॅंक्सबद्दल बोलण्याची माझी कुवतच नाही.. काय सुंदर अदाकारी.. काय सहजसुंदर अभिनय, त्याने भुमिकेचे bearing असे काही पकडले आहे ना..जणू तो आणि फक्त तोच फॉरेस्ट साकारू शकतो.. जगलाय तो ती भुमिका.. चित्रपट बघायच्या आधी मला वाटलेले, की खूप रडका आणि depressing असेल हा चित्रपट.. पण अतिशय हलक्याफुलक्या शैलीत मांडलाय सगळा प्रवास.. एक एक संवाद आठवून आठवून हसत राहवे, विचार करावा.. रंगून जावे

खरचं, हा नुसता पहाण्याचा चित्रपट नव्हेच.. हा एक प्रवास आहे, एक अनुभव आहे.. एक निरतिशय सुंदर अनुभवअगदी प्रत्येकाने अनुभवायलाच हवा असा अनुभव !!!…

 

मनाची दिवाळी…


बघता बघता दिवाळी आली…

.. सगळ्या घराघरांतून फराळाची मस्त तयारी सुरू झाली असेल नाही.. काय सुंदर सुंदर वास ऊठतं असतील.. चकली,चिवडा, लाडू.. अहा रेसगळं कसं नजरेसमोर तरळतयं माझ्याकेवढा उत्साह, एक वेगळचं चैतन्य.. रविवारी वसुबारस.. घरोघरी आकाशकंदील लागतील, पणत्यांनी उजळून जातील अंगणं..उटण्याचा तो खरखरीत पण तरी हवाहवासा वाटणारा स्पर्श, आईनी चोळूनमोळून घातलेली अंघोळ, नवीन कपडे, मग भल्या मोठ्या ताटातून एकत्र केलेला फराळ, गप्पांचे महापूर, फटाके..अरे लै भारीनुसतं आठवूनचं कसलं छान वाटतयंफार भारी….

आपल्याकडचे हे सगळे सणवार मला का आवडतात माहितेय?तर या सगळ्यामधील सर्वात भावणारां घटक काय वाटतो तर, उत्साह, अवर्णनीय उत्साहसगळ्या वातावरणातच एक सळसळता उत्साह असतो.. आणि तोच जास्त भावतो मला.. नाहीतर कित्येकदा आपण तेच तेच दैनंदीन रहाटगाडगे चालवत असतो.. कधी कधी तर वाटते ना, की जणू दोन रात्रींमधे जो दिवस येतो ना, तो समजत पण नाही, इतका डिट्टो सारखा असतो तो आदल्या दिवसासारखाच.. अरे शाळेतलं वेळापत्रक सुद्धा बदलतं दररोज.. पण  आपण तेच ते करत रहातो.. म्हणूनच हा अभुतपुर्व उत्साह खुणावतो मला सारखा.. असं वाटतं रोजचं आयुष्य दिवाळीसारखं झालं तर काय बहार येईल नाही.. पण असं जरतर म्हणून थोडीना ते असं बहारदार होणार आहे.. शेवटी त्या आयुष्याला आकार देणारे आपणचं , मग तो कसा द्यायचा हे पण आपणचं नको का ठरवायला..

आता तुम्ही म्हणालं , ही अचानक एवढ्या गहन विषयात कुठे शिरली? पण ना, मी गेले कित्येक दिवस विचार करतेय.. किती लहानसहान गोष्टींनी कष्टी होतो आपण.. हातात चार काम घेऊन बाहेर पडावं आणि नेमकी आपल्याला हवी ती दुकानचं बंद असावीत, झाले .. जमलं एक जळमटं मनावर, ऑफ़िसमधून येताना लागलं भयानक ट्रॅफिक, वाजवले लोकांनी निरर्थक हॉर्न.. चला नवीन एक जळमट.. नवीन वैताग.. आज जरासा उशीर झाला उठायला, राहिली आज देवपूजा.. जमु द्या एक आणखी जळमट.. आज असं कसं मीठ जास्त पडलं बुवा भाजीत.. जमतचं नाही मला काही..या रे या नवीन जळमटांनो स्वागत आहे तुमचं.. इतका मन लावून कोड केला , आलाच कसा डिफेक्ट.. अरे किती ..अजून एक.. .. आठवडा झाला, घर आवरलचं पाहिजे आता.. किती रे पसारापुन्हा एक नवीन ….

मन दिसेनाच मला , दिसताहेत फक्त ही अशी असंख्य जळमटं.. मगं म्हटलं.. आपण कसं घरात दिवाळी आली की करतोच की आवराआवर.. स्वच्छता.. सगळं कसं लक्ख दिसतं ना मगं.. म्हटलं यावेळी घराबरोबरचं जरा मनाची आवराआवर पण करावी.. भलतीच धूळ, पसारा आणि बरचं काही जमा झालयंजरा झाडून पुसून लक्ख करावं सगळं मन.. एक एक जळमट उचलून भिरकावून द्यायचं ठरवलयं मी.. घरातली रद्दी कशी दर महिन्याला घालून टाकतो आपण.. मग मनात का अशी रद्दी साठून द्यायची

आज अगदी ठणकावून सांगितलयं मी या सगळ्या पसार्‍याला.. बास झालं तुमचं आता.. खूप वेळ मुक्काम ठोकलात..चला आता निघा बघू.. मुळीच आदरातिथ्य होणार नाही आता.. भलतेच चिवट आहेत पण सगळे..  काय पण कारण देऊन तळ ठोकताहेत..  जोरात जोरात ओरडून ऐकायला लावताहेत मला.. म्हणताहेत.. अगं आमचा नुसत्ता उच्चार केलास कुणापुढे तर किती सहानुभुती मिळते तुला.. लगेच कसे सगळे म्हणतात, बिचारी, किती काम पडतं ना तिला.. फार फार कष्ट करावे लागतात.. …किती स्ट्रेस.. किती ताणतणाव आहेत ग बाळे.. कशाला करतेस नोकरी.. का घरातले काम पण….

बास बास कान घट्ट बंद केलेत मी.. नाही नाही ऐकाचचं नाही मला तुमचं, नको मला सहानुभुती.. नाहीच मी बिच्चारी आणि व्हायचं पण नाहिये मला.. लागू दे कष्ट करायला..असू दे सवय माझ्या मनाला, शरीराला कष्टाची.. नाहीच आहे मला भिती .. मी शिकलेय आवडीचं.. नोकरीही स्वतःच्या हिकमतीवर मिळवलीय.. आपल्या आईबाबांनी नाही का केल्या नोकर्‍या ३०३० वर्ष.. कधी केली का कुरबुर त्यांनी? बरं त्यांच्या नोकर्‍या एवढ्या ताणतणावाच्या नव्हत्या असा ही युक्तिवाद करतील काही.. पण खरचं असं होतं का.. माझे आईबाबा दोघेही डॉक्टर..आपण निदान निर्जीव वस्तूंवर काम करतो.. उद्या काही गडबड झाली तर फार फार तर काय होईल.. की ते सॉफ़्ट्वेअर बिघडेल वा तत्सम.. पण डॉक्टर म्हणजे सगळा जिवाशी खेळ..आणि रोजचा..किती ताण असतील या पेश्याचे..पण कधी कुरकुर नाही ऐकली.. अजूनही वयाच्या बासष्ठाव्या वर्षी बाबांना मी तितक्याच उत्साहाने ऑपरेशन करताना पहातेच ना मी. त्यांचीच मुलगी आहे मी .. नाही नाहीच येऊ द्यायचाय छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण स्वतःला..

खड्ड्यात गेला ताण तणाव..सगळ्याला पुरून उरणारे मी आता.. नकोत मला सहनुभुतीच्या कुबड्या..  नकोयत मला ही ओझी.. आणि नाहीच येऊ द्यायचाय असला फालतू ताण.. किती सुंदर गोष्टी आहे आयुष्यात.. किती नवीन काही शिकायचं, किती किती उत्तम उत्तम वाचायचयं..  किती छान जगायचं ..

तर या सगळ्या जळमटांनो या.. वेळ आलीय तुमच्या जाण्याची .. कायमचं भिरकावून देणार आहे मी या नसत्या ओझ्यांना… किती हलकं वाटतयं सांगू.. आणि एकदम स्वच्छ पण… आणि हो उत्साही.. माझ्या मनाची दिवाळी तर सुरू झाली सुद्धा अगदी आज आत्तापासूनच.. अगदी नीटसं, सुगंधी आणि चैतन्यदायी दिवाळी.. माझ्या मनाची दिवाळी…..

ता.क. : तुम्हा सर्वांना आणि तुमच्या उत्साही मनाला ही दिवाळी अतिशय सुख-सम्रुद्धीची, भरभराटीची जावो… 🙂